मुंबई: मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पाावसाने हाहाकार माजवला आहे. ढगफुटीमुले पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. एरवी पाण्याविना करपणारी पिकं यावर्षी पाण्यात वाहून गेली आहेत. जनावरेही पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. गेल्या 20 वर्षात पहिल्यांदाच इतकी भीषण परिस्थिती मराठवाड्यानं पाहिली आहे. 29 सप्टेंबरपर्यंत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासाठी धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विशेषतः 23 ते 29 सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात तयार होणारी कमी दाबाची नवीन प्रणाली लवकरच डिप्रेशनमध्ये रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात यंदाच्या नवरात्रीच्या सुरुवातीलाच अतिमुसळधार पावसाचा धोका निर्माण झाला आहे. पुढच्या दोन ते तीन दिवसात याची तीव्रता वाढू शकते.
मागील 24 तासात मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. बीडच्या पाटोदा येथे 150 मिमी पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय, अहमदनगर, सोलापूर, जळगाव, धाराशिव आणि संभाजीनगर या जिल्ह्यांमध्येही जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेतीतील पिकांना मोठा दिलासा मिळाला असला तरीही आगामी काळात पावसाचा वाढलेला जोर चिंतेचा विषय होऊ शकतो.
या आठवड्यात हवामान कसं राहणार?
24 सप्टेंबर: या दिवशी पावसाचा जोर काहीसा कमी होईल, पण पूर्व विदर्भात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
25 सप्टेंबर: नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर या भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
26 सप्टेंबर: पुणे, रायगड, सातारा, बीड, सोलापूर, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस राहील.
27 सप्टेंबर: या दिवशी पावसाचा सर्वाधिक जोर राहणार आहे. पुणे, रायगड, सातारा, बीड, सोलापूर, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी 150 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
28 सप्टेंबर: मुंबई, ठाणे, कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेला मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे.