Hera Feri 3: ‘हेरा फेरी’ या सिनेमात बाबुराव गणपतराव आपटे हे पात्र म्हणजे प्रेक्षकांच्या हृदयात घर करून बसलेलं आयकॉनिक पात्र. या पात्राला प्राण फुंकणारे परेश रावल हे प्रेक्षकांचे लाडके कलाकार. पण अलीकडील घडामोडींमुळे 'हेरा फेरी 3' भोवती निर्माण झालेला वाद प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतो आहे. काही दिवसांपूर्वी परेश रावल यांनी एका ट्विटमधून ‘हेरा फेरी 3’ सोडल्याचं जाहीर केलं आणि साऱ्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली.
परेश यांनी ही भूमिका का सोडली, याचा ठोस खुलासा न करता थेट सोशल मीडियावरून ही माहिती दिली. हे ट्विट समोर येताच अक्षय कुमारच्या टीमनं कारवाईचा पवित्रा घेतला. त्यानुसार, परेश रावल यांना 25 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागणारी कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. एवढंच नव्हे, तर ही रक्कम सात दिवसांत न भरल्यास पुढील कायदेशीर पावलं उचलण्यात येतील, असा इशारा अक्षयच्या टीमकडून देण्यात आला आहे.
हेही वाचा: IPL 2025: मुंबई इंडियन्सची प्लेऑफमध्ये दमदार एंट्री; 'या' दोन खेळाडूंनी केली चमकदार कामगिरी
या सगळ्या गोंधळावर 'हेरा फेरी 3' चे दिग्दर्शक प्रियदर्शन यांनीही मौन सोडलं आहे. ते म्हणाले की, 'परेश यांच्याशी तरी या निर्णयाबाबत थोडंसं बोलणं होईल असं वाटलं होतं. पण तसं काही झालं नाही. आम्ही नुकतंच ‘भूत बंगला’ चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं, ज्यामध्ये परेशही होता. तिथं त्याच्या वागण्यात काहीही विचित्र वाटलं नव्हतं.
प्रियदर्शन यांच्या म्हणण्यानुसार, परेश यांनी आधीच ‘हेरा फेरी 3’ साठी करार केला होता आणि त्यासाठी टोकन रक्कमही घेतली होती. एका दिवसाचं चित्रीकरणही झालं होतं. विशेष म्हणजे, चित्रीकरणानंतर परेश यांनी स्वतःहून हे सांगितलं होतं की, 'दुसरा भाग काहीसा कमजोर वाटला होता, पण यावेळी आपण एक जबरदस्त सिनेमा करूया.' त्यामुळे त्यांचा हा अचानक निर्णय सगळ्यांसाठीच धक्कादायक आहे.
या सगळ्या प्रकरणात अजून कोणताही अभिनेता परेश यांच्या जागी घेण्याचा निर्णय झाला नसल्याचंही प्रियदर्शन यांनी स्पष्ट केलं आहे. ‘हेरा फेरी’ हे प्रेक्षकांचं भावनिक नातं असलेलं फ्रँचाईज असून, बाबुराव आपटेशिवाय ते अपूर्ण वाटतं. त्यामुळे हा वाद किती वाढतो, की तो मिटतो, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं आहे.
या चित्रपटाचं भवितव्य आता काय वळण घेईल, याकडे संपूर्ण बॉलिवूड आणि चाहतेही उत्सुकतेने पाहत आहेत. ‘हेरा फेरी 3’ येईल, पण बाबुरावसोबत की त्यांच्याविना हा खरा प्रश्न आहे.