Anjali Damania: शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष आणि भोंदू अशोक खरात यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे डॉ. जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नीचा समृद्धी महामार्गावर झालेल्या एका भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या अपघाताबाबत गंभीर संशय व्यक्त केला आहे.
समृद्धी महामार्गावर काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. जितेंद्र शेळके यांचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, त्यामध्ये शेळके यांचा जागीच मृत्यू झाला. जितेंद्र शेळके हे केवळ खरात यांचे निकटवर्तीयच नव्हते, तर अशोक खरात यांच्यासोबत त्यांची व्यावसायिक भागीदारी देखील होती. या दोघांचे पार्टनरशिपमध्ये एक मोठे मंगल कार्यालय असल्याची माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे.
अंजली दमानिया यांचा घातपाताचा दावा
या घटनेवर प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्या म्हणाल्या, “जितेंद्र शेळके यांच्या निधनाची बातमी ऐकून मला धक्का बसला आहे. शेळके हे खरात यांच्या अत्यंत जवळचे होते. गेल्या काही दिवसांपासून खरात यांचा एन्काऊंटर होऊ शकतो, अशा चर्चा सुरू होत्या. अशातच त्यांच्या जवळच्या व्यक्तीचा झालेला हा मृत्यू अत्यंत धक्कादायक आणि संशयास्पद वाटतो.”
‘पुराव्यांना संपवण्याचा प्रयत्न?’
दमानिया यांनी आपल्या प्रतिक्रियेत पुढे असाही प्रश्न उपस्थित केला की, “असे किती घातापघात आपल्याला बघावे लागतील? मला तर असे वाटते की, आता ही एकेकाला संपवण्याची सुरुवात झाली आहे.” शेळके यांचा मृत्यू हा केवळ अपघात आहे की त्यामागे काही मोठे षडयंत्र आहे, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. खरात यांच्याशी संबंधित अनेक प्रकरणे सध्या चर्चेत असताना त्यांच्या निकटवर्तीयाचा झालेला हा मृत्यू अनेक प्रश्न उपस्थित करत आहे.