HSRP Number Plate: राज्यात जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 रोजी संपली आहे. मुदत संपल्यानंतर अनेक वाहनधारकांमध्ये संभ्रम आणि भीतीचं वातावरण होतं. आता आरटीओ किंवा पोलीस थेट दंड आकारणार का, असा प्रश्न अनेकांच्या मनात होता. मात्र सध्या तरी वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.
परिवहन विभागाने HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर सध्या कोणतीही कठोर कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्यांनी अजूनही आपल्या वाहनावर नवीन नंबर प्लेट बसवलेली नाही, त्यांना तूर्तास दंडाचा फटका बसणार नाही, असे संकेत मिळत आहेत.
राज्यात यापूर्वी जुन्या वाहनांना HSRP बसवण्यासाठी तीन खासगी एजन्सींची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र या कंत्राटदारांची मुदत संपल्यामुळे सध्या HSRP बसवण्याची प्रक्रिया अनेक ठिकाणी ठप्प आहे. याच कारणामुळे परिवहन विभागाने नवीन निविदा प्रक्रिया सुरू केली असून नव्या एजन्सीची निवड होईपर्यंत कारवाई थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या योजनेला याआधी चार वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे अनेक वाहनधारकांनी ऑनलाइन नोंदणी केली, मात्र प्रत्यक्षात नंबर प्लेट बसवण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकले नाहीत. काही ठिकाणी अपॉइंटमेंट मिळण्यात अडचणी, तर काही ठिकाणी फिटमेंट सेंटर्सची कमतरता ही मोठी समस्या ठरली.
पूर्वी सरकारकडून स्पष्ट करण्यात आले होते की, ऑनलाइन नोंदणी करूनही HSRP बसवली नसेल तर 1000 रुपयांचा दंड, तर कोणतीही नोंदणी न केलेल्या वाहनधारकांना 10 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. मात्र सध्या या दंडात्मक कारवाईबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे ही कारवाई तूर्तास स्थगित ठेवण्यात आली आहे.
आकडेवारी पाहिली तर राज्यात सुमारे 2 कोटी 10 लाख जुनी वाहने आहेत. त्यापैकी जवळपास 97 लाख वाहनांची ऑनलाइन नोंदणी झाली असून प्रत्यक्षात सुमारे 75 लाख वाहनांवरच HSRP बसवण्यात आली आहे. म्हणजेच अजूनही कोट्यवधी वाहने नवीन नंबर प्लेटच्या प्रतीक्षेत आहेत.
दरम्यान, ज्यांनी आधीच ऑनलाइन बुकिंग केले आहे, त्यांनी दिलेल्या तारखेला आणि वेळेला संबंधित फिटमेंट केंद्रावर जाऊन HSRP बसवून घ्यावी, असे आवाहन परिवहन आयुक्तांनी केले आहे. भविष्यात कारवाई सुरू झाल्यास अशा वाहनधारकांना कोणताही अडथळा येणार नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
याशिवाय पोलीस किंवा आरटीओकडून विविध गुन्हे, अपघात किंवा अन्य कारणांमुळे जप्त करण्यात आलेल्या वाहनांचं काय करायचं, तसेच भंगारात गेलेल्या वाहनांनाही HSRP सक्तीची आहे का, याबाबत अद्याप कोणतंही स्पष्ट धोरण ठरलेलं नाही. त्यामुळे या मुद्द्यावर प्रशासकीय स्तरावर निर्णयाची प्रतीक्षा आहे.
एकंदरीत, HSRP नंबर प्लेटची मुदत संपली असली तरी सध्या वाहनधारकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र पुढील काळात नियम कडक होण्याची शक्यता लक्षात घेता, प्रक्रिया पूर्ण ठेवणं हेच वाहनधारकांच्या हिताचं ठरणार आहे.