भंडारा : पत्नीला वाचवण्यासाठी पतीने कालव्यात उडी घेतली; मात्र या प्रयत्नात दोघांचाही बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील कोरंभी येथे घडली आहे. स्वप्निल बनकर आणि त्यांची पत्नी प्रज्ञा बनकर अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. या घटनेमुळे कोरंभी गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पाय घसरल्याने पत्नी कालव्यात पडली
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथे वास्तव्यास असलेले स्वप्निल बनकर आणि त्यांची पत्नी प्रज्ञा बनकर हे आपल्या मूळ गावी कोरंभी येथे आले होते. शेतातून परतत असताना प्रज्ञा या पाय धुण्यासाठी कालव्याच्या पायऱ्यांजवळ गेल्या. त्यावेळी अचानक त्यांचा पाय घसरला आणि त्या खोल पाण्यात पडल्या.पत्नी पाण्यात पडल्याचे लक्षात येताच स्वप्निल यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना वाचवण्यासाठी कालव्यात उडी घेतली. मात्र, कालव्यातील पाण्याची खोली आणि वेगवान प्रवाह यामुळे परिस्थिती गंभीर बनली. पत्नीला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्वप्निल यांनाही पाण्यातून बाहेर पडता आले नाही.
दुर्दैवी घटनेत दोघांचाही मृत्यू
या दुर्घटनेत स्वप्निल आणि प्रज्ञा या दोघांचाही बुडून मृत्यू झाला. पतीने पत्नीला वाचवण्यासाठी केलेला प्रयत्न अखेर अपयशी ठरल्याने या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. एकाच वेळी दाम्पत्याचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कोरंभी गावावर शोककळा
या हृदयद्रावक घटनेची माहिती समोर आल्यानंतर कोरंभी गावात शोककळा पसरली. एका क्षणात घडलेल्या या दुर्घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये दुःखाचे वातावरण आहे. कालवे आणि जलस्रोतांच्या परिसरात वावरताना विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.