Saturday, June 14, 2025 04:52:09 AM

बडतर्फ जवानाने केली पत्नीची निर्घृण हत्या; कोल्हापुरात खून करून आरोपी सोलापूर पोलिसांकडे हजर

कोल्हापुरातील ज्योतिबा डोंगरात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिचा निर्घृण खून केला. खून केल्यानंतर तो थेट सोलापूर पोलिस ठाण्यात गेला आणि गुन्ह्याची कबुली दिली

बडतर्फ जवानाने केली पत्नीची निर्घृण हत्या कोल्हापुरात खून करून आरोपी सोलापूर पोलिसांकडे हजर

सोलापूर : कोल्हापूर येथील प्रसिद्ध ज्योतिबा डोंगराच्या निर्जन भागात एका पतीने चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, खून केल्यानंतर आरोपी सोलापूरमधील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला आणि संपूर्ण खुनाची कबुली दिली. आरोपी पती सचिन चंद्रशेखर राजपूत (रा. कोल्हापूर) याने पत्नी शुभांगी हिचा चाकूने वार करून खून केल्याचे सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन राजपूत याने चारित्र्यावर संशय घेऊन पत्नी शुभांगीला कोल्हापूर येथील ज्योतिबा डोंगराच्या डोंगराळ व निर्जन भागात बोलावून घेतले. तेथे गप्पा मारत असताना त्याने अचानक चाकूने शुभांगीच्या चेहऱ्यावर, गळ्यावर आणि पोटावर जबरदस्त वार केले. त्या गंभीर वारांमुळे तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. खून केल्यानंतर आरोपीने मृतदेह तसाच त्या ठिकाणी ठेवला आणि कोल्हापूरमधून सोलापूरकडे मोटरसायकलवरून रवाना झाला.

हेही वाचा: Anti Submarine Warfare ARNALA: INS अर्नाळा’ची नौदलात दमदार एंट्री; देशातील पहिले अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट होणार कमिशन

सोलापूरमधील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात हजर होत त्याने संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना दिली. 'मी कोल्हापुरातून आलो असून, माझ्या पत्नीचा खून करून तिला घरात बंद करून आलो आहे,' असे सांगत त्याने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला. त्यानंतर सोलापूर पोलिसांनी तत्काळ कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधला. कोल्हापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने सांगितलेल्या ठिकाणी शोध घेतल्यानंतर कासारवाडी परिसरात मृतदेह सापडला.

सचिन राजपूत याने भारतीय सैन्यात आठ वर्ष सेवा बजावली होती. मात्र, एका महिलेबरोबर अशोभनीय वर्तन केल्यामुळे त्याला सेनेतून बडतर्फ करण्यात आले होते. सैन्य सेवेतून बडतर्फ झाल्यानंतर त्याच्यात मानसिक तणाव वाढल्याचेही बोलले जात आहे. पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेतल्याने पती-पत्नीमध्ये सतत भांडणे होत असत, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली.

हेही वाचा: ठाकरे बंधू एकत्र येणार? गिरगावात लावलेल्या बॅनरमुळे चर्चांना उधाण

सध्या आरोपीस सोलापूर पोलिसांनी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात सुपूर्त केले असून पुढील तपास कोल्हापूर पोलिस करत आहेत. पोलिसांनी खून करण्यात वापरलेला चाकू जप्त केला आहे. या घटनेने कोल्हापूरसह सोलापूर परिसरातही खळबळ उडाली असून, पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा जीव घेणाऱ्या पतीचा हा अमानुष कृत्य सर्वत्र निषेध केला जात आहे.

पोलीस तपासात अधिक धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. दरम्यान, शुभांगीच्या मृतदेहावर कोल्हापूर येथील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून, या घटनेचा सखोल तपास सुरू आहे.


सम्बन्धित सामग्री