Aniruddhacharya Maharaj : प्रसिद्ध कथाकार अनिरुद्धाचार्य महाराज हे त्यांच्या रोखठोक आणि कधीकधी वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातानंतर अनिरुद्धाचार्य महाराजांनी केलेल्या एका विधानाने आता सोशल मीडियावर नव्या चर्चेला उधाण आले आहे. आपल्या कथेदरम्यान त्यांनी या अपघाताचा संदर्भ देत वैमानिकाच्या कर्तव्यावर भाष्य केले आहे.
विमानातील प्रवाशांच्या जीवाची जबाबदारी पायलटची
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना अनिरुद्धाचार्य महाराज म्हणाले, "महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात मरण पावले. विमान सुरक्षित उडवण्याची आणि त्यातील प्रवाशांच्या जीवाची संपूर्ण जबाबदारी केवळ पायलटची असते. जर तुम्ही पायलट असाल, तर तुमचे काम अत्यंत प्रामाणिकपणे करा. तुम्हाला विमान सुरक्षित उतरवायचे आहे, पण ते करण्याऐवजी तुम्ही दुसरे काहीतरी करायला लागलात तर अनर्थ घडतो. स्वतःचे काम चोख बजावणे हीच तुमची खरी भक्ती आहे."
हेही वाचा - Ajit Pawar Funeral: भावाच्या निधनाने सुप्रियाताईंचा काळजाचा तुकडा हरपला; स्वतः सावरत सुनेत्रा वहिनी आणि भाच्यांसाठी बनल्या 'ढाल'
सैन्याचे उदाहरण देत कर्तव्याचे महत्त्व पटवून दिले
आपले म्हणणे स्पष्ट करण्यासाठी महाराजांनी भारतीय सैन्याचे उदाहरण दिले. ते म्हणाले, "आपली सेना सीमेवर तैनात आहे. दहशतवादी कारवाया रोखणे हे सैन्याचे मुख्य काम आहे. जर सर्व सैनिक आपले कर्तव्य सोडून मंदिरात येऊन बसले, तर देशाची सुरक्षा धोक्यात येईल. सैनिकासाठी त्याची प्रामाणिक देशसेवा हीच त्याची ईश्वरभक्ती आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक पेशातील व्यक्तीने आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडले पाहिजे."
अपघातात 5 जणांचा झाला मृत्यू
बुधवारी बारामती येथे विमान उतरवत असताना झालेल्या या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह पायलट आणि अन्य कर्मचाऱ्यांनिशी एकूण 5 जणांना आपला जीव गमवावा लागला. गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले, ज्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह देशातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.
सोशल मीडियावर उमटल्या प्रतिक्रिया
अनिरुद्धाचार्य महाराजांनी थेट पायलटच्या कामावर आणि प्रामाणिकपणावर प्रश्न उपस्थित केल्यामुळे नेटकऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत. काहींनी त्यांच्या 'कर्तव्य हीच भक्ती' या विचाराचे समर्थन केले आहे, तर काहींनी अपघाताचे नेमके कारण स्पष्ट नसताना वैमानिकावर अशा प्रकारे भाष्य करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.