Monday, February 09, 2026 01:52:35 PM

Pune ZP Election 2026 : राजकारण तापलं! दत्तात्रय भरणेंचा मुलगा अन् हर्षवर्धन पाटलांची लेक; एकाच चिन्हावर लढणार निवडणूक

इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरणे आणि पाटील कुटुंबातील दुसरी पिढी थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.

pune zp election 2026  राजकारण तापलं दत्तात्रय भरणेंचा मुलगा अन् हर्षवर्धन पाटलांची लेक एकाच चिन्हावर लढणार निवडणूक

इंदापूर (पुणे): जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कुटुंबातील दुसरी पिढी थेट निवडणुकीच्या रणांगणात उतरत असल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे हे आज बोरी पंचायत समिती गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून घड्याळ या निवडणूक चिन्हावर ते निवडणूक लढवणार असून, त्यांच्या या प्रवेशामुळे भरणे कुटुंबातील दुसरी पिढी अधिकृतपणे राजकारणात सक्रिय होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

दुसरीकडे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता ठाकरे पाटील या इंदापूर तालुक्यातील बावडा जिल्हा परिषद गटातून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्या देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: Vande Bharat Sleeper Train: वंदे भारतचं तिकीट कॅन्सल करायचंय? डोकं शांत ठेवून तिकीट बुक करा; 'हा' नवा नियम वाचला नाही तर खिसा होईल रिकामा

इंदापूर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत यावेळी दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्रितपणे निवडणूक लढवत असल्याने ही लढत अधिकच लक्षवेधी ठरत आहे. अनेक वर्षांपासून राजकीय मतभेदासाठी ओळखले जाणारे हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांचे संबंध आता या निवडणुकीनिमित्ताने नव्या वळणावर येणार का, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

विशेष म्हणजे, एकीकडे भरणे कुटुंबाची दुसरी पिढी पंचायत समितीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करत असताना, दुसरीकडे पाटील कुटुंबातील कन्या थेट जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत असल्याने इंदापूर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यातील जुने राजकीय मतभेद या निवडणुकीमुळे संपुष्टात येणार का, की नव्या पिढीसह संघर्षाला नवे रूप मिळणार, हे येत्या निकालातून स्पष्ट होणार आहे. इंदापूर तालुक्यातील मतदारांसाठी ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची नसून, राजकीय वारसांची ताकद मोजणारी ठरणार आहे.

हेही वाचा: BJP Party: दिल्लीच्या तख्तावर नबीन, तर मैदानात महाराष्ट्राचे वाघ; विनोद तावडे आणि आशिष शेलारांचे राष्ट्रीय राजकारणात प्रमोशन


सम्बन्धित सामग्री