छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर झालेली ओळख प्रेमसंबंधात बदलल्यानंतर लग्नाचे आश्वासन देत एका 22 वर्षीय तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. पीडित तरुणी गर्भवती झाल्यानंतर संबंधित तरुणाने लग्न करण्यास नकार दिल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी हे प्रकरण शिर्डी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डी परिसरातील एका 22 वर्षीय तरुणीची सुमारे वर्षभरापूर्वी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून डोणगाव (ता. वैजापूर) येथील आकाश दगू कसबे याच्याशी ओळख झाली होती. ऑनलाइन संवादातून दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली आणि त्यानंतर या मैत्रीचे प्रेमसंबंधात रूपांतर झाल्याचे सांगण्यात आले आहे.
तक्रारीनुसार, आरोपीने तरुणीशी लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. त्याच विश्वासावर एप्रिल आणि मे 2026 या कालावधीत शिर्डी येथील एका लॉजमध्ये तिच्याशी अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले. हे संबंध परस्पर संमतीने नसून लग्नाच्या खोट्या आश्वासनाच्या आधारे प्रस्थापित करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.काही दिवसांनंतर तरुणीला आपण गर्भवती असल्याचे समजले. ही बाब आरोपीला सांगितल्यानंतर त्याने लवकरच विवाह करू, असे सांगत तिला आपल्या डोणगाव येथील घरीही नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मात्र, कुटुंबीयांची संमती नसल्याचे कारण पुढे करत आरोपीने लग्नाचा विषय सातत्याने टाळल्याचा आरोप आहे.
अखेर संबंधित तरुणाने लग्नास स्पष्ट नकार दिला. एवढेच नव्हे, तर त्याने तरुणीचा मोबाईल क्रमांकही ब्लॉक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर 24 जुलै रोजी खासगी रुग्णालयात तपासणी केली असता तरुणी सुमारे तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर पीडित तरुणीने विरगाव पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी आकाश दगू कसबे याच्याविरुद्ध संबंधित कायदेशीर कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. घटना शिर्डी परिसरातील असल्याने पुढील तपास शिर्डी पोलिसांकडे सोपवण्यात आला असून, प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.