अजय घोडके, प्रतिनिधी, लातूर | जवळपास एक वर्षांपूर्वी लातूर येथे आरोग्य सेवा उपसंचालक पदावर रुजू झालेल्या डॉ. रेखा गायकवाड यांच्या लातूरातील कामकाजाची चौकशी करण्याचे आदेश राज्याच्या शहरी आरोग्य सेवाचे आयुक्त तथा राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाचे संचालक डॉ. सुनिल भोकरे यांनी दिल्याने आरोग्य प्रशासनातील अधिकाऱ्यांचे अंतर्गत राजकारण चव्हाट्यावर आल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
आरोग्य उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड यांनी दि.25 ऑगस्ट, 2025 रोजी लातूरच्या कार्यालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या कार्यकाळात वैद्यकीय अधिकारी गट -अ (एस-20) यांचे प्रतिनियुक्ती,अस्थायी नियुक्ती, बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती, गट-क व ड संवर्गातील अधिकारी,कर्मचाऱ्यांची नियुक्ती, बदल्या, प्रतिनियुक्ती, पदोन्नती प्रक्रिया, वैद्यकीय अधिकारी यांची अनधिकृत गैरहजेरी/ खाजगी व्यवसाय/ बोगस व्यवसायिका विरुद्ध केलेली कारवाई, उपसंचालक स्तरावरून क्षेत्रीय कार्यालये/ रुग्णालयांना देण्यात आलेल्या तांत्रिक मंजुरी प्रक्रिया शिवाय औषधे/ उपकरणे/ साहित्य सामग्री इत्यादी खरेदी व इतर आर्थिक बाबींची चौकशी करण्याचे आदेश मुंबईच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाचे सहसंचालक राजेंद्र भालेराव यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहेत. ही चौकशी करण्यासाठी आयुक्त डॉ. सुनिल भोकरे यांनी दि. 16 सप्टेंबर, 2026 रोजी स्वतःच्या स्वाक्षरीने स्वतःच अध्यक्ष असलेली 09 सदस्यांची चौकशी समिती नियुक्त केल्याचे पत्र जारी केले. ज्यामध्ये मोहम्मद अन्वर हुसेन ( सहाय्यक अधीक्षक जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, लातूर), डॉ. रउफ शेख ( सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, बीड), श्री. सुपेकर ( प्रशासकीय अधिकारी, जिल्हा परिषद,बीड ), प्रकाश सानप ( प्रशासकीय अधिकारी, जिल्हा परिषद,बीड ), डॉ. अमोल बाग ( राज्य कार्यक्रम व्यवस्थापक, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान,मुंबई), रविकांत सालमे ( वरिष्ठ लिपिक,जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, लातूर), विजय कुडके ( कनिष्ठ लेखा अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय,बीड), गोविंद शेंडगे ( कनिष्ठ सहाय्यक, जिल्हा सामान्य रुग्णालय,बीड) यांचा समावेश होता. त्यामुळे आयुक्त डॉ.सुनील भोकरे यांच्या दोन चौकशी समित्यांच्या नियुक्तीवरून अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.
आयुक्त डॉ. सुनिल भोकरे यांनी
स्वतःच्या स्वाक्षरीने स्वतःच अध्यक्ष असलेली 09 सदस्यांची चौकशी समिती बदलून अवघ्या 24 तासात दुसरी 06 सदस्यांची चौकशी का नियुक्त केली ?, पहिल्या नऊ सदस्यांच्या समितीमध्ये एकट्या बीड जिल्ह्यातील 05 सदस्यांचा समावेश का केला होता? उपसंचालक पदाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्रशासकीय अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, जिल्हा आरोग्य अधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी अशा कनिष्ठ पदावरील कर्मचाऱ्यांची नियुक्ती का केली? नव्या चौकशी समितीत लेखा विभागाचा एकही सदस्य नसल्याने आर्थिक बाबींची चौकशी कशी होणार ? उपसंचालकाची चौकशी स्वतः आयुक्त हे अध्यक्ष असलेल्या समितीने करावे असा कोणाचा दबाव आहे का ? लातूरच्या आरोग्य उपसंचालकाची केवळ एक वर्षाच्या कामकाजाचीच चौकशी का केली जाते? एक वर्षापूर्वीच्या कामकाजाची चौकशी का केली जात नाही? असे अनेक सवाल या चौकशीच्या अनुषंगाने उपस्थित केले जात आहेत.
आता नव्या समितीत लातूर येथून एक वर्षांपूर्वी आरोग्य उपसंचालक पदावरून बदलून गेलेल्या व मुंबईत सहसंचालक असलेल्या डॉ.अर्चना भोसले यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचीही लातूर येथील ‘उपसंचालक’ पदावरील कारकीर्द वादग्रस्त राहिलेली आहे. डॉ. भोसले यांनी अधिसंख्य पदाच्या नियुक्तीचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे शासन नियम डावलून लातूर शहर महानगरपालिकेतील
वैद्यकीय अधिकारी गट -अ (एस-20) यांची केलेली प्रतिनियुक्ती, वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्याच्या वेळोवेळी केलेल्या बदली, लातूर शहरातील आरोग्य केंद्राची निर्मिती, लातूर शहर महानगरपालिका शहर कार्यक्रम व्यवस्थापक यांच्या ‘परफॉर्मन्स रिपोर्ट’ वरील बनावट स्वाक्षरी प्रकरण व अस्थायी नियुक्ती, बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती, गट-क व ड संवर्गातील अधिकारी,कर्मचाऱ्यांची नियुक्ती, बदल्या, प्रतिनियुक्ती, पदोन्नती प्रक्रिया, वैद्यकीय अधिकारी यांची अनधिकृत गैरहजेरी/ खाजगी व्यवसाय/ बोगस व्यवसायिका विरुद्ध केलेली कारवाई, उपसंचालक स्तरावरून क्षेत्रीय कार्यालये/ रुग्णालयांना देण्यात आलेल्या तांत्रिक मंजुरी प्रक्रिया शिवाय औषधे/ उपकरणे/ साहित्य सामग्री इत्यादी खरेदी व इतर आर्थिक बाबींची चौकशी राज्याच्या शहरी आरोग्य सेवाचे आयुक्त तथा राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाचे संचालक डॉ. सुनिल भोकरे का करत नाहीत? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
डॉ. सुनिल भोकरे यांच्या उपस्थितीत लातूर येथे आरोग्य उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड यांच्या कामकाजाची उच्चस्तरीय चौकशी व नांदेड येथे राज्याचे आरोग्य सेवाचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक संजय काटकर यांच्या उपस्थित आढावा बैठक एकाच दिवशी होणार आहे. दि.28 सप्टेंबर, 2026 रोजी लातूर आरोग्य सेवा परिमंडळातील सर्व वरिष्ठ अधिकारी नांदेड येथे उपस्थित राहण्याचे पत्र जारी करण्यात आले आहे. सध्या आरोग्य सेवा उपसंचालक, लातूर या पदासाठी अनेक अधिकारी मोर्चेबांधणी करत असल्याने डॉ. रेखा गायकवाड यांच्या कामकाजाची चौकशी राजकीय हेतूने प्रेरित असल्याची चर्चा डॉ. गायकवाड यांच्या ‘व्हाट्सअप चॅट’मुळे चर्चेत आली आहे. राज्यातील एका कॅबिनेट मंत्र्याच्या स्वीय सहाय्यकाने या चौकशीसाठी विशेष लक्ष घातल्याने चौकशी होणारच नाही यासाठी पुणे, मुंबई व्हाया कोल्हापूर असा ‘रेखांकित’ गोपनीय दौरा झाल्याची विश्वसनीय माहिती समोर आल्याने आरोग्य प्रशासनातील अधिकाऱ्यांचे शह-काटशहाचे राजकारण लातुरात चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.