Monday, March 09, 2026 09:08:25 AM

Chhatrapati Sambhajinagar : 'हेच का तुमचं बेगडी हिंदुत्व?'; परीक्षेदरम्यान महिलांना मंगळसूत्र काढण्याच्या सक्तीवरून अंबादास दानवे आक्रमक

या संवेदनशील मुद्द्यावरून आता राजकारणही तापले असून, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला 'हिंदुत्वा'च्या मुद्द्यावरून धारेवर धरले आहे.

chhatrapati sambhajinagar  हेच का तुमचं बेगडी हिंदुत्व परीक्षेदरम्यान महिलांना मंगळसूत्र काढण्याच्या सक्तीवरून अंबादास दानवे आक्रमक

TET Exam Controversy: छत्रपती संभाजीनगरमधील एका परीक्षा केंद्रावर महिला परीक्षार्थींना त्यांचे मंगळसूत्र काढून वर्गात प्रवेश देण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेदरम्यान (TET) सुरक्षेच्या नावाखाली घडलेल्या या प्रकारामुळे परीक्षार्थी महिलांमध्ये तीव्र नाराजी असून, राज्यभरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. या संवेदनशील मुद्द्यावरून आता राजकारणही तापले असून, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला 'हिंदुत्वा'च्या मुद्द्यावरून धारेवर धरले आहे.

नेमकी घटना काय ?
आज सकाळी परीक्षा केंद्रांवर कडक तपासणी सुरू असताना मेटल डिटेक्टरचा वापर करण्यात येत होता. मात्र, तपासणी दरम्यान केवळ दागिनेच नव्हे, तर महिलांना त्यांचे 'सौभाग्याचं लेणं' म्हणजेच मंगळसूत्र आणि इतर अलंकार काढून ठेवण्याची सक्ती करण्यात आली. अनेक विवाहित महिलांनी या सक्तीला कडाडून विरोध केला, मात्र केंद्र प्रमुखांच्या ताठर भूमिकेमुळे परीक्षार्थींना नाइलाजास्तव मंगळसूत्र काढावे लागले. यावेळी अनेक महिलांना अश्रू अनावर झाले होते. ज्या महिलांसोबत नातेवाईक नव्हते, त्यांच्यावर आपले मौल्यवान दागिने बॅगेत किंवा असुरक्षित ठिकाणी ठेवण्याची वेळ आली, ज्यामुळे दागिन्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला होता.

'हेच का तुमचं बेगडी हिंदुत्व?' - अंबादास दानवेंचा सरकारला सवाल
या घटनेवर संताप व्यक्त करत अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. "स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या सरकारच्या राज्यात हिंदू संस्कृतीतील प्रतिकांचा अपमान होत आहे," असे त्यांनी म्हटले. दानवे पुढे म्हणाले की, मंगळसूत्र हे केवळ दागिना नसून ते सौभाग्याचे प्रतीक आहे. पेपरफुटी रोखण्यासाठी यंत्रणा सक्षम करणे गरजेचे आहे, पण महिलांच्या भावनांशी खेळणे चुकीचे आहे. महिलांना मंगळसूत्र उतरायला लावणे ही संस्कृती नसून तो स्त्रीशक्तीचा अपमान आहे, अशी बोचरी टीका त्यांनी केली.

हेही वाचा - Sayaji Shinde: 'दादांचं स्वप्न पूर्ण व्हावं…' सयाजी शिंदेंनी घेतली सुनेत्रा पवार आणि शरद पवारांची भेट ; विलीनीकरणावर नेमकी काय चर्चा झाली?

प्रशासनाविरुद्ध नाराजी आणि वाढता तणाव
या प्रकारामुळे परीक्षा केंद्राबाहेर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सरकारला पारदर्शक परीक्षा घ्यायची असेल तर त्यांनी हायटेक तंत्रज्ञानाचा वापर करावा, परंतु धार्मिक आणि सांस्कृतिक भावना दुखावणारे नियम लादू नयेत, अशी मागणी आता परीक्षार्थी आणि पालकांमधून होत आहे. पेपरफुटीवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरलेले प्रशासन आता सर्वसामान्य परीक्षार्थींना नाहक त्रास देत असल्याचा सूर उमटत आहे.


सम्बन्धित सामग्री