विजय चिडे, प्रतिनिधी, जालना: कौटुंबिक वादातून बाप-लेकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जालन्यातील बदनापूर येथे हा प्रकार घडला आहे. बदनापूर शहरातील शंकरनगर भागात लहान भावाने काही नातेवाईकांच्या मदतीने मोठ्या भावाचा व पुतण्याचा भर दिवसा चाकू भोसकून खून केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अशोक अंबिलढगे व यश अंबिलढगे अशी मृतांची नावं आहेत.
जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरातील शंकरनगर भागातील अशोक अंबिलढगे व त्यांच्या लहान भावात काही कारणावरून 13 मे रोजी सकाळी बाचाबाची होऊन मारहाण झाली. वाद झाल्यानंतर दुपारी 1 च्या सुमारास अशोक अंबिलढगे (वय 55) व त्यांचा मुलगा यश अंबिलढगे (वय 22) हे आपल्या घरात बसले असताना अचानक लहान भाऊ विष्णू अंबिलढगे व त्याच्यासोबत अन्य काही नातेवाईक आणि मित्र आले. त्यानंतर पुन्हा वाद विवाद सुरु झाला. त्यांच्यातील भांडण जवळपास 20 मिनिट झाले. दरम्यान नातेवाईक आणि मित्रांपैकी काही जणांनी थेट अशोक अंबिलढगे यांच्या पोटात धारदार शस्त्राने वार सुरु केले. तसेच यश अंबिलढगे याच्या गळ्यावर चाकूचे वार केल्याने दोघेही रक्तबंबाळ झाले. हा प्रकार बघणाऱ्यांपैकी एकाने पोलिसांना फोन केला व त्यानंतर काही वेळाने पोलीस आले. परंतु हल्लेखोर फरार झाले होते.
हेही वाचा : पाकव्याप्त काश्मीरवरचा ताबा सोडा - परराष्ट्र मंत्रालय
अशोक अंबिलढगे व यश अंबिलढगे यांना तात्काळ बदनापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. विशेष म्हणजे सदर घटना पोलीस ठाण्याच्या 300 मीटर अंतरावर घडली आहे. दरम्यान पोलिसांनी विष्णू अंबिलढगे याला तपासासाठी पोलीस ठाण्यात नेले.