वाढत्या महागाईच्या सावटाखाली जगणाऱ्या गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या दैनंदिन आहारावर आता वाढत्या धान्यांच्या दरांचा मोठा परिणाम दिसून येत आहे. सर्वसामान्यांच्या ताटातील महत्त्वाची असणारी ज्वारीची भाकरी आता अधिक महाग झाली आहे. खुल्या बाजारात चांगल्या प्रतीच्या ज्वारीच्या दराने प्रति किलो 100 रुपयांचा टप्पा पार केला आहे. अवघ्या 2 आठवड्यांपूर्वी 85 रुपये प्रति किलो दराने विकली जाणारी ज्वारी आता थेट 100 ते 105 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. राज्यातील काही भागांत निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती, ज्वारीचे घटलेले उत्पादन आणि बाजारातील मागणीच्या तुलनेत होणारा अपुरा पुरवठा, यामुळे ही मोठी भाववाढ झाल्याचे धान्य व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
इतर कडधान्यही महागले
धान्य बाजारातील मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 1 महिन्यात विविध प्रकारच्या ज्वारी आणि बाजरीच्या भावात लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. यामध्ये विशेषतः शाळू ज्वारीचे भाव सर्वाधिक वाढले असून, पूर्वी 65 रुपये असणारी शाळू ज्वारी आता थेट 105 ते 110 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे, म्हणजेच यामध्ये एकाच महिन्यात 45 रुपयांची वाढ झाली आहे. याशिवाय, गावरान ज्वारीचा भाव पूर्वीच्या 55 रुपयांवरून वाढून 60 ते 75 रुपये झाला आहे. दुरी प्रकारच्या ज्वारीच्या दरातही 10 रुपयांची वाढ होऊन तो 45 ते 55 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. केवळ ज्वारीच नव्हे, तर बाजरीच्या दरातही प्रतिकिलो 8 रुपयांची वाढ झाली असून, ती आता 35 ते 40 रुपये किलो दराने विकली जात आहे.
दुष्काळाची झळ आता थेट ग्राहकांच्या खिशाला
शेती उत्पादनात झालेली घट आणि हवामानातील प्रतिकूल बदलांमुळे धान्याचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे सुरुवातीला केवळ शेतकऱ्यांपर्यंत सीमित असणारी दुष्काळाची झळ आता थेट शहरी भागातील ग्राहकांच्या खिशाला बसू लागली आहे. मुख्य अन्नधान्यांपैकी एक असलेल्या ज्वारीचे दर अचानक गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे मासिक बजेट पार कोलमडले आहे. येत्या काही दिवसांत बाजारात नवीन मालाची आवक वाढल्याशिवाय हे दर नियंत्रणात येण्याची शक्यता कमीच असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.