KFC च्या किचनमध्ये नेमकं काय चाललं होतं?, FDA च्या तपासणीत धक्कादायक खुलासा, थेट परवानाच निलंबित!

KFC License Suspended : छत्रपती संभाजीनगरमधील बीड बायपास येथील KFC वर FDA ने धडक कारवाई केली. अस्वच्छता, नियमांचे उल्लंघन आणि आरोग्यास धोका असल्याने परवाना निलंबित केला असून सर्व व्यवहार तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
KFC च्या किचनमध्ये नेमकं काय सापडलं?
FDA Action Against KFC Outlet in Chhatrapati Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगर : अन्न सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे आणि ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणे प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय फूड KFC ब्रँडला चांगलेच महागात पडले आहे. अन्न आणि औषध प्रशासनने छत्रपती संभाजीनगरमधील बीड बायपास, शाहनूरवाडी येथील ‘सफायर फूड्स इंडिया लिमिटेड’ संचलित KFC चा परवाना तात्काळ निलंबित करून धडक कारवाई करण्यात आली आहे.

KFC मध्ये FDA ला काय दिसलं?
मिळालेल्या माहितीनुसार, अचानक केलेल्या पाहणीदरम्यान या उपाहारगृहात अनेक थक्क करणाऱ्या आणि आरोग्याला थेट धोका निर्माण करणाऱ्या बाबी उघडकीस आल्या, ज्यामध्ये प्रामुख्याने कच्चे आणि शिजवलेले अन्न तसेच शाकाहारी आणि मांसाहारी अन्नपदार्थ एकत्र ठेवण्यात आले होते. गरम आणि थंड अन्नाचे तापमान राखण्याबाबत कमालीचा हलगर्जी दिसून आला.

खाद्यतेलाचा तपासणी अहवाल आणि अन्न तपासणी प्रमाणपत्रे जागेवर उपलब्ध नव्हती. तसेच, अन्नाच्या संपर्कात येणाऱ्या पॅकेजिंग साहित्याबाबत एनएबीएल प्रयोगशाळेचे प्रमाणपत्रही आढळले नाही. अन्न वाढण्याचे साहित्य अस्वच्छ होते, ड्रेनेजमध्ये कचरा साठलेला होता, फरशी अत्यंत निसरडी होती आणि कीटक नियंत्रणाबाबत कोणतीही नोंद ठेवली गेलेली नव्हती.

सर्व व्यवहार बंद करण्याचे आदेश
या सर्व गंभीर त्रुटींमुळे अन्नाचे संदूषण होऊन ग्राहकांच्या आरोग्याला आणि जिवाला मोठा धोका निर्माण होऊ शकत असल्याचा निष्कर्ष प्रशासनाने काढला आहे. निलंबनाच्या या कालावधीत संबंधित आस्थापनेला अन्न तयार करणे, प्रक्रिया करणे, विक्री करणे आणि वितरण करण्यासह ग्राहकांना पुरवठा करण्याचे सर्व व्यावसायिक कामकाज पूर्णपणे बंद ठेवावे लागणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version