Sonam Maskar: आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (Asian Games 2026) मध्ये भारताने आपल्या पदकांचा श्रीगणेशा केला आहे. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक क्रीडा प्रकारात भारतीय त्रिमुकुटाने उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करत रौप्यपदकावर आपले नाव कोरले. या यशस्वी संघात कोल्हापूरची गुणवंत नेमबाज सोनम मस्कर हिच्यासह एलावेनिल वलारिवन आणि विदर्सा कोचालुमकाल विनोद यांचा समावेश होता. भारतीय संघाने एकूण 1898.0 गुणांची कमाई करत स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. सोनमने वैयक्तिक पातळीवर चमकदार कामगिरी करताना 634.1 गुण मिळवून पात्रता फेरीत तिसरा क्रमांक पटकावला आणि भारताचे पदक निश्चित करण्यात मोलाचा वाटा उचलला. याशिवाय एलावेनिलने 633.5 तर विदर्साने 630.4 गुणांचे योगदान दिले.
शेती विकून घेतली होती रायफल
सोनमच्या या ऐतिहासिक विजयामागे तिच्या कुटुंबाचा मोठा संघर्ष आणि समर्पण दडले आहे. कोल्हापुरातील अत्यंत सामान्य पार्श्वभूमी असलेल्या मस्कर कुटुंबात सोनमच्या क्रीडा स्वप्नांना बळ देण्यासाठी तिच्या वडिलांनी, उत्तम मस्कर यांनी स्वतःची जमीन विकली होती. आधुनिक रायफल खरेदी करण्यासाठी आलेला मोठा खर्च पेलताना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला; मात्र वडिलांनी मुलीच्या कौशल्यावर विश्वास कायम ठेवला. 2019 मध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना सोनमने पहिल्यांदा रायफलीला हात लावला होता. सुरुवातीच्या स्थानिक स्पर्धांमध्ये मिळालेल्या यशामुळे तिचा आत्मविश्वास उंचावला आणि तिने नेमबाजीलाच आपली कारकीर्द बनवण्याचा ठाम निर्णय घेतला.
आई-वडिलांच्या चरणी पदक समर्पित; भविष्यात सुवर्णवेध घेण्याचा मानस
आपल्या आंतरराष्ट्रीय यशाचे संपूर्ण श्रेय सोनमने आपल्या पालकांच्या त्यागाला दिले आहे. "वडिलांनी माझ्यासाठी केलेल्या संघर्षाची जाणीव मला प्रत्येक स्पर्धेत असते आणि हे आंतरराष्ट्रीय पदक मी माझ्या आई-वडिलांना समर्पित करते," अशी भावना तिने व्यक्त केली. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीवर मात करत सोनमने मिळवलेल्या या यशामुळे कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात तिचे कौतुक होत आहे. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे आगामी वैयक्तिक स्पर्धांमध्येही भारताला सुवर्णपदकाची मोठी आशा निर्माण झाली आहे.