Kolhapur Gokul Milk Union Election Result 2026: कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठा मानल्या गेलेल्या ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीचे निकाल आता समोर येऊ लागले आहेत. या अटीतटीच्या निवडणुकीत नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी पॅनलने दणदणीत मुसंडी मारत तब्बल 16 जागांवर मजबूत आघाडी घेतली आहे. सतेज पाटलांच्या पॅनलने बहुमत मिळवण्याच्या दिशेने पाऊल टाकल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कोल्हापुरात त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला. महायुतीसाठी हा एक अत्यंत मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
महाडिक-मुश्रीफ पॅनल 9 जागांसह पिछाडीवर; नविद मुश्रीफ आणि शौमिका महाडिक पराभूत झाल्याची माहिती
सुरुवातीच्या कलांनुसार महायुतीचे नेतृत्व करणाऱ्या महाडिक-मुश्रीफ पॅनलला या निवडणुकीत मोठा फटका बसला असून त्यांचे केवळ 9 उमेदवार आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे, या चुरशीच्या लढतीत नविद मुश्रीफ आणि शौमिका महाडिक यांच्यासारख्या प्रमुख चेहऱ्यांचा पराभव झाल्याचे समोर आले आहे. निकालातील या अनपेक्षित फेरबदलामुळे महायुतीच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले असून, पराभवाच्या छायेत असलेल्या महायुतीकडून आता फेरमतमोजणीची मागणी केली जात आहे.
कमी मतांच्या फरकामुळे फेरमतमोजणीची मागणी; सतेज पाटील मतमोजणी केंद्रावर दाखल
काही जागांवर विजयाचे अंतर अत्यंत अल्प असल्यामुळे महायुतीमधील उमेदवारांनी फेरमतमोजणीचा अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे मतमोजणी प्रक्रियेत पुन्हा एकदा रंगत निर्माण झाली असून, स्वतः सतेज पाटील हे एक मतदार प्रतिनिधी म्हणून मतमोजणी केंद्रावर दाखल झाले आहेत. फेरमतमोजणीनंतर अंतिम निकाल काय लागणार आणि गोकुळची सत्ता नेमकी कोणाच्या हातात जाणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.