मुंबई: कोकण रेल्वे मार्ग म्हणजे केवळ प्रवास नाही, तर निसर्गरम्य अनुभवाची एक खास सफर मानली जाते. विशेषतः मुंबई ते गोवा दरम्यान धावणाऱ्या गाड्यांना वर्षभर प्रवाशांची मोठी गर्दी असते. तिकीट मिळवण्यासाठी होणारी धावपळ, प्रतीक्षा यादीची चिंता आणि सणासुदीच्या काळातील वाढलेली मागणी लक्षात घेता कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेसला आता कायमस्वरूपी अतिरिक्त डबे जोडण्यात आले आहेत.
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या ट्रेन क्रमांक 20111 आणि 20112 कोकणकन्या एक्स्प्रेसमध्ये 3 टियर इकॉनॉमीचा एक अतिरिक्त डबा कायमस्वरूपी समाविष्ट करण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 25 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झाली आहे. वाढत्या प्रवासी संख्येमुळे विशेषतः सुट्ट्यांच्या हंगामात निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
याच धर्तीवर ट्रेन क्रमांक 10103 आणि 10104 मुंबई ते मडगाव मांडवी एक्स्प्रेसलाही 3 टियर इकॉनॉमीचा एक अतिरिक्त कोच जोडण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही गाड्यांमध्ये मिळून सुमारे 166 अतिरिक्त जागांची कायमस्वरूपी वाढ झाली आहे. आतापर्यंत 22 एलएचबी डब्यांसह धावणाऱ्या या गाड्या आता 23 डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत धावतील. सुधारित संरचनेत फर्स्ट एसी, 2 टियर एसी, 3 टियर एसी, 3 टियर इकॉनॉमी, स्लीपर, जनरल, पॅन्ट्री कार, जनरेटर कार आणि एसएलआर डब्यांचा समावेश कायम ठेवण्यात आला आहे.
हेही वाचा: Rajya Sabha Election: महायुती पुन्हा खेळणार जुना डाव? राज्यसभा निवडणुकीआधी भाजपच्या बैठकीत मोठे निर्णय
कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासासाठी कोकणकन्या आणि मांडवी एक्स्प्रेस या गाड्या प्रवाशांची पहिली पसंती मानल्या जातात. दररोज हजारो प्रवासी या मार्गावर प्रवास करत असल्याने अतिरिक्त डब्यांची मागणी सातत्याने होत होती. “मागणी तिथे सुविधा” या तत्वानुसार रेल्वे प्रशासनाने घेतलेला हा निर्णय कोकण, मुंबई आणि गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाने आणखी एक महत्त्वाचा बदल जाहीर केला असून लोकमान्य टिळक टर्मिनस–सिकंदराबाद दुरांतो एक्सप्रेस (12219/12220) ही गाडी सुधारित संरचनेसह पूर्णपणे वातानुकूलित स्वरूपात चालविण्यात येणार आहे. या गाडीत एक फर्स्ट एसी, 4 एसी द्वितीय, 12 एसी तृतीय, एक पॅन्ट्री कार आणि दोन जनरेटर कार असे एकूण 20 एलएचबी डबे असतील. ही सुधारित सेवा 25 एप्रिल 2026 पासून सुरू होणार आहे.
सुधारित संरचनेसह कोकण रेल्वेच्या या महत्त्वाच्या बदलांची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली आहे. ट्रेन क्रमांक 20112 मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोकणकन्या एक्स्प्रेस 24 फेब्रुवारी 2026 पासून नव्या संरचनेसह धावू लागली असून, ट्रेन क्रमांक 20111 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस 25 फेब्रुवारी 2026 पासून अतिरिक्त डब्यासह प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. त्याचप्रमाणे मांडवी एक्स्प्रेसच्या ट्रेन क्रमांक 10103 आणि 10104 या दोन्ही गाड्यांमध्येही 25 फेब्रुवारी 2026 पासून सुधारित कोच संरचना लागू करण्यात आली आहे. दरम्यान, लोकमान्य टिळक टर्मिनस–सिकंदराबाद दुरांतो एक्सप्रेस (12219/12220) ही पूर्णपणे वातानुकूलित सुधारित रचनेसह 25 एप्रिल 2026 पासून चालविण्यात येणार असून, प्रवाशांना अधिक आरामदायी आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव देण्याच्या दृष्टीने हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे.
रेल्वे प्रवास अधिक आरामदायी आणि नियोजनबद्ध करण्याच्या दिशेने घेतलेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात असून, वाढत्या प्रवासी संख्येला प्रतिसाद देत सुविधा वाढविण्याचा रेल्वेचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून येत आहे. परिणामी, कोकण मार्गावरील प्रवाशांचा प्रवास आता अधिक सोयीस्कर आणि तणावरहित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा: Indian Restaurant in London: 16 वर्षांपासून भारतीय खाद्यसंस्कृतीची ओळख बनलेले ‘Rangrez’ रेस्टॉरंट होणार कायमचे बंद; 'हे' धक्कादायक कारण आले समोर