Monday, November 17, 2025 01:16:12 AM

Kurla Railway Station Project: कुर्ला उन्नत रेल्वेमार्ग प्रकल्पाला गती; 410 मीटर लांबीचा रॅम्प तयार, डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणार काम

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 410 मीटर लांबीचा रॅम्प बांधण्यासाठी जागा पूर्णपणे मोकळी करण्यात आली असून काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.

kurla railway station project कुर्ला उन्नत रेल्वेमार्ग प्रकल्पाला गती 410 मीटर लांबीचा रॅम्प तयार डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणार काम

Kurla Railway Station Project: कुर्ला रेल्वे स्थानक परिसरात बराच काळ रखडलेला उन्नत रेल्वेमार्ग प्रकल्प अखेर आता पुढील काही दिवसांत पूर्ण होणार आहे. अनेक वर्षांपासून जागेअभावी आणि प्रशासकीय अडथळ्यांमुळे ठप्प असलेले काम आता पुन्हा सुरू झाले आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 410 मीटर लांबीचा रॅम्प बांधण्यासाठी जागा पूर्णपणे मोकळी करण्यात आली असून काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर, संपूर्ण 1339 मीटर लांबीच्या उन्नत रेल्वेमार्गाचा आराखडा वेगाने आकार घेईल. या प्रकल्पामुळे कुर्ला स्थानकाचा चेहरामोहरा बदलणार आहे.

कुर्ला ते चुन्नाभट्टीदरम्यान नवीन उन्नत स्थानक

कुर्ला हे मुंबईच्या मध्य आणि हार्बर लाईनवरील सर्वात गजबजलेले जंक्शन मानले जाते. दररोज चार ते पाच लाख प्रवासी या ठिकाणी प्रवास करतात. अरुंद प्लॅटफॉर्म, जुन्या पादचारी पुलांमुळे प्रवाशांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने उन्नत रेल्वेमार्ग उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कुर्ला ते चुन्नाभट्टीदरम्यान एक नवीन उन्नत स्थानक तयार होईल. या प्रकल्पात तीन ट्रॅक, तीन फलाट आणि पनवेल दिशेने गाड्या वळवण्यासाठी विशेष सुविधा असतील. त्यामुळे कुर्ला-पनवेल दरम्यान शटल सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल.

हेही वाचा - Satara Sainik School Modernisation: सातारा सैनिक शाळेला 450 कोटींचा निधी; नवे वसतिगृह आणि आधुनिक सुविधा निर्माण होणार

दोन्ही बाजूंनी रॅम्प बांधकाम सुरू

दरम्यान, चुन्नाभट्टीकडील बाजूला नवीन टॉवर वॅगन वर्कशॉप तयार झाले असून, आता तिथली जागा पूर्णपणे मोकळी आहे. सीएसएमटीकडील दिशेनेही जागा तयार झाल्याने दोन्ही बाजूंनी रॅम्पचे बांधकाम एकाचवेळी सुरू करण्याची तयारी आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, अडथळे दूर झाल्याने प्रकल्पाचा वेग आता लक्षणीय वाढेल.

प्रकल्पातील महत्त्वाचे घटक

उन्नत मार्ग चुन्नाभट्टी स्थानकानंतर सुरू होईल आणि टिळकनगरजवळ मुख्य रेल्वेमार्गाशी जोडला जाईल. या प्रकल्पात तीन स्वतंत्र ट्रॅक बांधण्यात येणार आहेत. प्रकल्पाची अंतिम मुदत डिसेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.

गर्दी कमी आणि प्रवास अधिक सुरक्षित

रेल्वे प्रशासनाच्या मते, या प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे कुर्ला स्थानकावरील प्रवाशांची गर्दी कमी करणे. सध्या अरुंद प्लॅटफॉर्म आणि पुलांमुळे प्रवासात अडथळे निर्माण होतात. पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होते. नवीन उन्नत मार्ग आणि सुधारित पायाभूत सुविधा उभारल्यानंतर प्रवाशांना अधिक मोकळेपणाने हालचाल करता येईल. सुरक्षित, जलद आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल. कामाच्या गतीवर परिणाम होऊ नये म्हणून बहुतांश बांधकाम रात्रीच्या वेळी केले जाणार आहे. रेल्वे प्रशासनाने सांगितले की, प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत, प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे लक्ष्य डिसेंबर 2025 पर्यंत ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा - Latur: लातूरमध्ये तुटलेले दात असलेला जिवंत साप सापडला; नेमकं प्रकरण काय?

प्रवाशांना मोठा दिलासा

कुर्ला उन्नत रेल्वेमार्ग प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील रेल्वे प्रवासाचा अनुभव अधिक सोयीस्कर होणार आहे. गर्दी कमी होईल, शटल सेवा उपलब्ध होईल आणि स्थानकावरून थेट बाहेर पडण्यासाठी नवे मार्ग तयार होतील. हा प्रकल्प फक्त संरचनेत सुधारणा करणारा नाही, तर मुंबईच्या रेल्वे वाहतुकीत नवा टप्पा निर्माण करणारा महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरेल.


सम्बन्धित सामग्री