अजय घोडके, प्रतिनिधी, लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा एक दवाखाना चक्क ग्रामीण भागात ग्रामपंचायत हद्दीत थाटला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे लातूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत लातूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून नागरी आयुष्यमान आरोग्य केंद्र शहराच्या विविध भागात सुरू आहेत. परंतु लातूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर जावून आर्वी ग्रामपंचायतच्या हद्दीत आपला दवाखाना सुरु केला आहे. लातूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. शंकर भारती व शहर कार्यक्रम व्यवस्थापक रामेश्वर कलवले या अधिकाऱ्यांनी सदर दवाखाना मागील एक ते दीड वर्षापासून आर्वी ग्रामपंचायतच्या हद्दीत सुरू केला असून त्यासाठी लाखो रुपयांचे जागेचे भाडे महानगरपालिका अदा करत आहे. लातूर शहर महानगरपालिकेच्या शहरातील आरोग्य केंद्रात डॉक्टरांचा तुटवडा असून डॉक्टर व कर्मचारीविना शहरातील रुग्णांची विविध आरोग्य केंद्रात मोठी हेळसांड होत असल्याचे चित्र सर्रासपणे दिसून येत असताना आता आर्वी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये मागील एक वर्षापासून महापालिकेचा दवाखाना सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
हेही वाचा :निलेश चव्हाणच्या घरावर छापेमारी
लातूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. शंकर भारती व शहर कार्यक्रम व्यवस्थापक रामेश्वर कलवले यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर जावून आर्वी ग्रामपंचायत हद्दीत लातूर शहर महानगरपालिकेचा दवाखाना सुरू केला आहे. त्यामुळे डॉ. शंकर भारती व रामेश्वर कलवले या दोन मुजोर अधिकार्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्वराज्य पक्षाने दिलेल्या निवेदनात केली असून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.