पुणे: 'लाडकी बहिणी' योजनेवरून सरकारवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. निवडणुकीत महिलांच्या मतांचा वापर करून आता त्यांनाच अपात्र ठरवले जात असल्याचा आरोप करत, 'ज्या लाडक्या बहिणींवर सरकार प्रेम करत होतं, त्याच आता सरकारला नकोशा झाल्यात,' अशी टीका हाकेंनी केली.
लक्ष्मण हाके म्हणाले, 'निवडणुकीच्या काळात सरकारला बहिणींचे मत हवे होते. तेव्हा त्या लाडक्या वाटत होत्या. पण आता निवडणूक संपल्यावर सरकारला त्याच बहिणी अडथळा वाटू लागल्या आहेत. पुणे जिल्ह्यात तब्बल 6000 महिलांना अपात्र ठरवून त्यांना योजनांपासून वंचित करण्यात आलं आहे. ही अत्यंत दुर्दैवी आणि अन्यायकारक गोष्ट आहे.'
हेही वाचा:FDA action on Zepto warehouse: झेप्टोच्या ऑनलाईन ग्रॉसरी गोदामावर FDA ची कारवाई; खराब अन्नसाठा आणि नियमभंगाचे प्रकार उघड
सरकारचा महिलांबाबतचा दुटप्पीपणा; हाकेंची टीका
हाके म्हणाले की, निवडणुकीत प्रचार करताना सरकार महिला सक्षमीकरण, सुरक्षा, आरक्षण अशा मुद्द्यांवर मोठमोठ्या घोषणा करते. पण प्रत्यक्षात महिलांच्या अधिकारांवर गदा आणणारे निर्णय घेतात. “आज त्या लाडक्या बहिणी सरकारला नकोशा वाटत आहेत. हा महिलांचा अवमान आहे. सरकारने त्यांच्या मतांचा वापर करून आता त्यांनाच दारात उभं केलं आहे,” असा आरोप त्यांनी केला.
6000 महिलांना अपात्र ठरवले जाणं धक्कादायक
पुणे जिल्ह्यात 6000 महिलांना योजनांसाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे. हाके यांनी हा मुद्दा उपस्थित करत सांगितलं की, “हे जर असंच सुरू राहिलं, तर सरकार स्वतःच्या हातानेच स्वतःसाठी खड्डा खणत आहे. जनतेचा विश्वास गमावण्याची ही सुरुवात आहे. महिलांनी आता डोळसपणे विचार करून सरकारला योग्य उत्तर द्यावं.'
ओबीसी समाजही सरकारवर नाराज
हाके यांनी ओबीसी समाजाच्या मुद्द्यावरूनही सरकारला धारेवर धरलं. “ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न आजही तसाच आहे. महिलांबरोबरच ओबीसी समाजालाही सरकार डावलत आहे. हे सरकार केवळ निवडणुकीपुरतं लोकांवर प्रेम करतं, त्यानंतर त्यांनाच दूर सारतं,' असा टोलाही त्यांनी लगावला.
हेही वाचा:जामखेडमध्ये लघुशंकेवरून वाद; तिघा अज्ञातांकडून गोळीबार, युवक जखमी
सरकारविरोधात जनआंदोलनाचा इशारा
हाके यांनी शेवटी स्पष्ट इशारा दिला की, 'जर सरकारने महिलांवरील अन्याय तात्काळ थांबवला नाही आणि अपात्र ठरवलेल्या महिलांना पुन्हा पात्र केलं नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल.'
हाकेंच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली असून, महिलांविषयी सरकारची भूमिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.