धारावी: झेप्टोसारख्या वेगाने वाढणाऱ्या ऑनलाईन ग्रॉसरी डिलिव्हरी प्लॅटफॉर्मच्या गोदामावर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (एफडीए) कडून अचानक कारवाई करण्यात आली आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली झेप्टोची मूळ कंपनी किराणाकार्ट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड यांचा धारावी येथील परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आला आहे.
ही कारवाई राज्यमंत्री योगेश कदम यांच्या निर्देशानुसार अन्न सुरक्षा अधिकारी राम बोडके यांनी केली. धारावीतील झेप्टोच्या गोदामावर छापा टाकण्यात आला असता, अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या. तपासणी दरम्यान काही अन्नपदार्थांवर बुरशीची वाढ झालेली असल्याचे अधिकाऱ्यांनी नोंदवले. याशिवाय गोदामातील कोल्ड स्टोरेजचे तापमान नियमानुसार राखले गेले नव्हते, ज्यामुळे अन्नाची गुणवत्ता धोक्यात आली होती.
याशिवाय, अन्नपदार्थ साचलेल्या व तुंबलेल्या पाण्याजवळ साठवून ठेवलेले होते, जे आरोग्यदृष्टीने अत्यंत घातक आहे. मुदत संपलेले खाद्यपदार्थही वेगळे करून ठेवलेले नव्हते, यामुळे ग्राहकांपर्यंत दूषित किंवा निकृष्ट दर्जाचे अन्न पोहोचण्याचा धोका वाढतो.
हेही वाचा: Sambhajiraje Chhatrapati: छत्रपती संभाजीराजे यांनी दिली महत्त्वाची माहिती; रायगडावर सापडले प्राचीन खगोलशास्त्रीय यंत्र
एफडीएच्या अधिकाऱ्यांनी या छाप्यादरम्यान विविध अन्ननमुने जमा करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पुढील कारवाई होणार आहे. संबंधित कंपनीकडून याबाबत स्पष्टीकरण मागवले गेले असून, तपासात सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ग्राहकांच्या आरोग्यासंदर्भात कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे एफडीएने स्पष्ट केले आहे. झेप्टो ही अल्पावधीत लोकप्रिय झालेली डिलिव्हरी सेवा असली तरी, अशा प्रकारच्या अनियमित गोष्टी उजेडात येणे म्हणजे अन्न सुरक्षा यंत्रणेसाठी एक गंभीर इशारा आहे.
या घटनेनंतर झेप्टोच्या इतर गोदामांचीही तपासणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाने सर्व ऑनलाईन डिलिव्हरी कंपन्यांना अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी थट्टा करणाऱ्या कोणत्याही संस्थेवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही एफडीएने दिला आहे.