Saturday, March 07, 2026 01:55:19 AM

Ajit Pawar Plane Crash: 'रोहित पवारांप्रमाणेच आम्हालाही यात मोठा कट वाटतोय...'; पिंकी माळीच्या वडिलांच्या दाव्याने खळबळ

या भीषण दुर्घटनेत प्राण गमावलेली पिंकी माळी हिचे वडील शिवकुमार माळी यांनी या प्रकरणावर मौन सोडले असून, हा केवळ तांत्रिक अपघात नसून 'घातपात' असल्याचा थेट आरोप केला आहे.

ajit pawar plane crash रोहित पवारांप्रमाणेच आम्हालाही यात मोठा कट वाटतोय पिंकी माळीच्या वडिलांच्या दाव्याने खळबळ

Ajit Pawar Plane Crash: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेला आता एक नवीन आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. या भीषण दुर्घटनेत प्राण गमावलेली पिंकी माळी हिचे वडील शिवकुमार माळी यांनी या प्रकरणावर मौन सोडले असून, हा केवळ तांत्रिक अपघात नसून 'घातपात' असल्याचा थेट आरोप केला आहे. त्यांच्या या दाव्याने संपूर्ण राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, अपघाताच्या चौकशीबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

विमानाचा रंग बदलला आणि पायलटचे गूढ; संशयास्पद बाबींवर बोट
शिवकुमार माळी यांनी अपघाताच्या दिवशी घडलेल्या काही संशयास्पद बदलांकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी पिंकीने अजितदादांसोबत 4 वेळा प्रवास केला होता, तेव्हा नेहमी 'काळ्या आणि करड्या' रंगाचे विमान असायचे. मात्र, अपघाताच्या दिवशीच अचानक 'पांढऱ्या' रंगाचे विमान का वापरण्यात आले? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तसेच, ऐनवेळी पायलट का बदलण्यात आला, याचेही गूढ कायम आहे. वाहतूक कोंडीमुळे जुना पायलट पोहोचू शकला नाही, हे प्रशासनाचे कारण फेटाळताना, "मुंबईत पहाटे 6 वाजता अशी कोणती ट्रॅफिक असते?" असा रोकडा सवाल माळी यांनी उपस्थित केला आहे. 

हेही वाचा - Satara ZP Election : साताऱ्यात भाजपला 'चेकमेट'! राष्ट्रवादी-शिवसेनेचे गठबंधन? गुप्त बैठकांनंतर चर्चांना वेग

रोहित पवारांच्या दाव्यांना बळकटी; राजकीय वर्तुळात चर्चा
आमदार रोहित पवार यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन विमान कंपनीच्या मालकावर आणि त्यांच्या संशयास्पद कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. रोहित पवारांनी मांडलेले मुद्दे आणि पिंकी माळीच्या वडिलांचे आरोप यामध्ये मोठे साधर्म्य दिसून येत आहे. "रोहित पवारांप्रमाणेच आम्हालाही यात मोठा कट वाटतोय," असे माळी कुटुंबियांनी स्पष्टपणे म्हटले आहे. यामुळे या प्रकरणातील संशय अधिकच गडद झाला असून, आता यामागे एखादे मोठे षडयंत्र आहे का, याची चर्चा सुरू झाली आहे.

साधे सांत्वनही नाही; माळी कुटुंबाची प्रशासनाविरुद्ध खंत
आपल्या तरुण मुलीला गमावल्याचे दुःख व्यक्त करताना शिवकुमार माळी यांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. "पिंकीने पहिल्यांदाच त्या विशिष्ट विमानातून प्रवास केला आणि तोच तिचा शेवटचा प्रवास ठरला," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विशेष म्हणजे, इतकी मोठी दुर्घटना होऊनही अद्याप प्रशासनाकडून सांत्वन करण्यासाठी कोणीही आले नाही किंवा कोणतीही शासकीय मदत अथवा भरपाई मिळालेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.


सम्बन्धित सामग्री