Thursday, July 17, 2025 01:48:36 AM

जनतेच्या पैशाचा गैरवापर? राष्ट्रीय परिषदेत खासदार-आमदारांना चांदीच्या ताटात शाही भोजन

राष्ट्रीय परिषदेत खासदार-आमदारांना व्हाईट मेटल ताटात शाही भोजन, 4500 रुपये प्रति जेवण खर्च; सार्वजनिक निधीच्या वापरावरून प्रश्न उपस्थित, विधीमंडळाचे स्पष्टीकरण मात्र धुसर.

जनतेच्या पैशाचा गैरवापर राष्ट्रीय परिषदेत खासदार-आमदारांना चांदीच्या ताटात शाही भोजन

मुंबई: मुंबईत नुकतीच संसद आणि राज्य विधीमंडळाच्या अंदाज समितीच्या सदस्यांसाठी दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद पार पडली. या परिषदेत खासदार आणि आमदारांसाठी खास शाही भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये चांदीसदृश ताटांमध्ये पंचपक्वान्न वाढण्यात आले. या जेवणासाठी प्रति सदस्य तब्बल 4,500 रुपयांचा खर्च केल्याचे समोर आले आहे. यामुळे आता जनतेच्या पैशाच्या वापराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

या प्रकरणावरुन विधीमंडळावर टीकेची झोड उठली आहे. एका बाजूला सरकार जनतेला काटकसरीचे संदेश देत आहे, तर दुसरीकडे लोकप्रतिनिधींच्या भोजनावर हजारो रुपयांचा खर्च केल्याने संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या जेवणासाठी वापरण्यात आलेल्या थाळींचे भाडे 550 रुपये होते आणि भोजनाचा खर्च 4 हजार रुपये होता.

हेही वाचा: एमडी ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपीला व्हीआयपी वागणूक

मात्र, या प्रकरणावर विधीमंडळाच्या सूत्रांनी स्पष्टीकरण दिले आहे की, वापरलेली ताटं चांदीची नसून व्हाईट मेटलमधील आर्टिफिशियल ताटं होती. तसेच, वास्तविक जेवणाचे दरही यापेक्षा कमी असल्याचा दावा करण्यात आला आहे. तरीही या प्रकरणावर अधिकृतपणे कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

या साऱ्या प्रकारामुळे अंदाज समितीच्या जबाबदारीवर देखील प्रश्न उपस्थित झाले आहेत. ज्यांच्या हातात खर्च कमी करण्याची जबाबदारी आहे, त्यांनीच शाही थाटात जेवण घेणे, कितपत योग्य? असा सवाल सध्या निर्माण झाला आहे.


सम्बन्धित सामग्री