मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर होत आहे. सोमवारी (ता. 5 मे) दुपारी 1 वाजता बारावीचे निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर होतील. त्याआधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक मंडळाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी निकाल सांगण्यात आला असून या वर्षी बारावीचा निकाल 91.88 टक्के लागला आहे. यामध्ये कोकण विभाग अव्वल आला असून मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. तर सर्वाधिक कमी निकाल हा लातूर विभागाचा निकाल लागला आहे.
कोकण विभाग अव्वल
राज्यातील नऊ विभागांमध्ये कोकण विभागाने सर्वाधिक 96.74 टक्के निकालासह पहिला क्रमांक पटकावला आहे. याउलट, लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 89.46 टक्के लागला आहे. एकेकाळी ‘लातूर पॅटर्न’साठी प्रसिद्ध असलेल्या लातूरच्या निकालात घसरण झाली असून यावर चर्चा सुरू झाली आहे. या निकालामुळे कोकण विभागाने आपले शैक्षणिक वर्चस्व पुन्हा सिद्ध केले आहे.
12th HSC Result 2025 Website Link: स्कोअरकार्ड पीडीएफ डाउनलोड होणार 'या' अधिकृत वेबसाइटवर
मुलींची पुन्हा एकदा बाजी निकालात आघाडीवर
या वर्षीही मुलींनी निकालात मुलांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. राज्यभरात मुलींची यशाचा टक्का अधिक असून त्यांनी विविध विभागांमध्ये आघाडी घेतली आहे. हा ट्रेंड गेल्या काही वर्षांपासून कायम असून मुलींनी शिक्षणात सातत्याने प्रगती साधली आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी
यंदा 7,258 दिव्यांग विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यापैकी 6,905 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची यशाचा टक्का 92.39 इतका आहे. ही कामगिरी अत्यंत प्रेरणादायी आहे. शारीरिक अडचणी असूनही या विद्यार्थ्यांनी यशाची उंची गाठली आहे, हे निश्चितच कौतुकास्पद आहे.
विभाग आणि शाखांनुसार यशाचे चित्र
विभागनिहाय पाहिल्यास कोल्हापूर (93.64%), मुंबई (92.93%), संभाजीनगर (92.24%) हे विभाग कोकणच्या पाठोपाठ आहेत. शिक्षण शाखांनुसार विज्ञान शाखेचा निकाल 97.35%, वाणिज्य 92.68%, कला 80.52%, व्यवसाय अभ्यासक्रम 83.03% आणि आयटीआय शाखेचा निकाल 82.03% लागला आहे. या निकालांवरून विविध शाखांमध्ये विद्यार्थ्यांनी सरासरीच्या पुढे कामगिरी केल्याचे स्पष्ट होते.
बारावीच्या परीक्षेत कोणत्या विभागाची बाजी
पुणे - 91.32
नागपूर- 90.52
संभाजीनगर- 92.24
मुंबई- 92.93
कोल्हापूर- 93.64
अमरावती- 91.43
नाशिक- 91.31
लातूर- 89.46
कोकण- 96.74