राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठीची ही मोठी निवडणूक प्रक्रिया 4 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आली होती. यामध्ये 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींचा समावेश होता. मात्र न्यायालयीन आणि तांत्रिक कारणांमुळे 20 नगरपरिषद आणि 4 नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. 76 नगरपरिषद आणि नगरपंचायतींमधील एकूण 154 सदस्यपदांची निवडणूकही पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांना आज सकाळी 7.30 वाजता सुरुवात झाली असली तरी काही ठिकाणी तांत्रिक बिघाडामुळे मतदान प्रक्रियेला उशीर झाला आहे.
जालना जिल्ह्यातील भोकरदन नगरपालिकेतील मतदान केंद्र क्रमांक आठ वर EVM मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदान अद्याप सुरूच होऊ शकले नाही. गेल्या 15 मिनिटांपासून मशीनची दुरुस्ती सुरू असून, रांगेत उभे असलेले मतदार नाराजी व्यक्त करत आहेत.
यवतमाळमधील आर्णी येथील मतदान केंद्र क्र. नऊवरही EVM च्या कंट्रोल युनिटमध्ये ‘प्रेस एरर’ झाल्याची घटना समोर आली आहे. वरील खोली क्रमांक तीन मध्ये असलेल्या या युनिटला तांत्रिक बिघाड आल्याने मतदानाला सुमारे 20 मिनिटांचा विलंब झाला. तांत्रिक चमूच्या हस्तक्षेपानंतर मशीन पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आणि मतदान प्रक्रिया सुरू झाली.
दरम्यान, सातारा जिल्ह्यातील सात नगरपालिका आणि एक नगरपंचायतीसाठी मतदान शांततेत सुरू आहे. सातारा, म्हसवड, पाचगणी, रहिमतपूर, कराड, मलकापूर आणि मेढा नगरपंचायतीसह विविध ठिकाणी मतदार सकाळपासून मोठ्या संख्येने मतदानासाठी प्रवेशद्वारावर पोहोचले आहेत. एकूण तीन लाखांहून अधिक मतदार आज आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असून 374 मतदान केंद्रांवर 2352 कर्मचारी तैनात आहेत.
आजची मतदान प्रक्रिया सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. काही ठिकाणच्या तांत्रिक अडचणी असूनही प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी तातडीचे उपाय केले जात आहेत. मतदारांनी संयम बाळगून मतदान करण्याचे आवाहनही निवडणूक अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.