Thursday, February 12, 2026 07:01:52 PM

Maharashtra Election Result 2026: राज्यात 'कमळ' जोमाने फुलले; भाजप नंबर एक, तर शिंदेंची शिवसेना दुसऱ्या स्थानी; वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर

महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या निवडणुकीत भाजपने 25 महापालिकांवर सत्ता मिळवत ऐतिहासिक महाविजय नोंदवला आहे.

maharashtra election result 2026 राज्यात कमळ जोमाने फुलले भाजप नंबर एक तर शिंदेंची शिवसेना दुसऱ्या स्थानी वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर

मुंबई: महाराष्ट्रातील मिनी विधानसभा मानल्या जाणाऱ्या 29 महापालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक कामगिरी करत विरोधकांना चारी मुंड्या चित केले आहे. राज्याच्या राजकीय क्षितिजावर भाजपने आपली पकड अधिक घट्ट केली असून, तब्बल 25 महापालिकांमध्ये विजय मिळवत सत्ता काबीज केली आहे. विशेषतः आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका समजल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेत 25 वर्षांपासून सुरू असलेली ठाकरे घराण्याची एकहाती सत्ता उलथवून लावत, भाजपने भगवा फडकवला आहे.

मुंबईत ‘मिशन’ यशस्वी; ठाकरे बंधूंची युती अपयशी

मुंबई महापालिकेची यंदाची निवडणूक ही प्रतिष्ठेची लढाई होती. तब्बल 20 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ ‘मराठी अस्मिते’च्या मुद्द्यावर एकत्र आले होते. मात्र, मतदारांनी विकासाच्या मुद्द्याला कौल दिल्याचे चित्र निकालातून स्पष्ट झाले आहे. भाजप 89 जागांसह मुंबईत सर्वात मोठा पक्ष ठरला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या 29 जागांसह महायुतीने बहुमताचा आकडा पार केला आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65 जागांवर समाधान मानावे लागले. ठाकरे बंधूंच्या युतीला एकत्रित 71 जागा मिळाल्या असल्या तरी, मुंबईचा महापौर आता महायुतीचाच होणार हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ झाले आहे.

हेही वाचा: BMC Election 2026: BMC सत्तास्थापनेत नवा ट्विस्ट, महापौरपद अडीच-अडीच वर्ष देण्याची शिवसेनेची मागणी

पक्षनिहाय बलाबल: आकड्यांच्या खेळात भाजपची बाजी

राज्याभरातील नगरसेवकांच्या संख्येवर नजर टाकल्यास भाजपचा दबदबा स्पष्टपणे दिसून येतो. एकूण 1425 नगरसेवकांसह भाजप अग्रस्थानी आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 399 जागा जिंकत आपली ताकद सिद्ध केली आहे. काँग्रेसने 324 जागांवर विजय मिळवला असला तरी, त्यांना मोठ्या शहरांत म्हणावे तसे यश मिळाले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांची आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची कामगिरी संमिश्र राहिली असून, मनसे आणि एमआयएमला केवळ काही जागांमध्येच आपले अस्तित्व राखता आले आहे.

राज्यातील सविस्तर आकडेवारी 

महापालिका निवडणूक निकालांमध्ये नगरसेवकांच्या संख्येचा विचार केला असता, भारतीय जनता पक्षाने 1425 विजयी नगरसेवकांसह सर्वाधिक वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यानंतर शिवसेना (एकनाथ शिंदे गट) 399 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेसने 324 नगरसेवक जिंकत तिसरे स्थान पटकावले असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने 167 जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) ला 155 जागांवर समाधान मानावे लागले, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ने 36 जागा जिंकल्या आहेत. मनसेला 13, एआयएमआयएमला 125, बसपाला 6 तर अपक्ष व इतर उमेदवारांनी मिळून 19 जागांवर विजय मिळवला आहे.
राज्याच्या शहरी भागावर भाजपचे वर्चस्व

पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नागपूर आणि नवी मुंबई यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या शहरांमध्ये भाजपने निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. महाविकास आघाडीला केवळ भिवंडी, लातूर, चंद्रपूर आणि वसई-विरार या 4 महापालिकांमध्ये आपले अस्तित्व टिकवता आले आहे. उर्वरित सर्व महत्त्वाच्या शहरांत महायुतीची सत्ता येणार असल्याने, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने मोठी आघाडी घेतली आहे.

बदलेली राजकीय समीकरणे आणि आगामी वाटचाल

या निकालांनी हे सिद्ध केले आहे की, केवळ भावनिक साद घालून आता सत्ता मिळवणे कठीण झाले आहे. मतदारांनी पायाभूत सुविधा, मेट्रो आणि शहरी विकासाच्या ‘ब्रँड भाजप’ला पसंती दिली आहे. ठाकरेंसाठी हा निकाल म्हणजे “गड आला पण सिंह गेला” असा नसून, “गडही गेला आणि ताकदही कमी झाली” अशी परिस्थिती निर्माण करणारा ठरला आहे. आता मुंबईत भाजपचा महापौर बसल्यानंतर शहराच्या राजकारणाची दिशा पूर्णपणे बदलेल, यात शंका नाही.

हेही वाचा: Apple India Fine: ॲपलला भारताचा झटका ! 3 लाख कोटी रुपयांच्या दंडाची टांगती तलवार; नेमकं प्रकरण काय?


सम्बन्धित सामग्री