Wednesday, February 18, 2026 05:55:10 PM

BMC Election Helpline Number: मतदानाला जायला बॉस सुट्टी देत नाहीये? मग 'या' नंबरवर करा एक फोन; पालिकेची होणार थेट कारवाई

सरकारीसह खासगी कंपन्या, आयटी हब आणि मॉल्सना सुट्टी देणे बंधनकारक असून नियम मोडल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

bmc election helpline number मतदानाला जायला बॉस सुट्टी देत नाहीये मग या नंबरवर करा एक फोन पालिकेची होणार थेट कारवाई

मुंबई: येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होऊ घातलेल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी प्रशासनाने कंबर कसली असून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. 'लोकशाहीचा उत्सव' साजरा करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेसह (BMC) संबंधित सर्व क्षेत्रांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, केवळ सरकारीच नव्हे तर खासगी कंपन्या, आयटी हब आणि अगदी मॉल्समधील कर्मचाऱ्यांनाही मतदानासाठी सुट्टी देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

मतदानासाठी सुट्टी अनिवार्य; नियमांचे उल्लंघन महागात पडणार

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या क्षेत्रातील सर्व दुकाने, कारखाने, हॉटेल, नाट्यगृहे आणि औद्योगिक उपक्रम यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जर एखाद्या कंपनीने किंवा आस्थापनेने या नियमाचे उल्लंघन करून कर्मचाऱ्यांना कामावर बोलावले, तर त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांसाठी विशेष 'दक्षता पथके' तैनात करण्यात आली असून ते आस्थापनांच्या हालचालींवर लक्ष ठेवणार आहेत.

हेही वाचा: Devendra Fadnavis Speech: "राज ठाकरेजी, तुम्हीही ऐकून घ्या..." हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर फडणवीसांनी सभेत पुराव्याचा कागदच फडकवला

अपवादात्मक परिस्थितीत 'विशेष सवलत'

काही अत्यावश्यक सेवा किंवा अशा आस्थापना जिथे पूर्ण दिवस सुट्टी दिल्यास मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते, अशा ठिकाणी प्रशासनाने काही प्रमाणात लवचिकता दाखवली आहे. मात्र, अशा परिस्थितीतही कर्मचाऱ्यांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी किमान दोन ते तीन तासांची विशेष सवलत देणे सक्तीचे असेल. मतदानापासून कोणताही नागरिक वंचित राहणार नाही याची खात्री करणे ही संबंधित मालकाची किंवा व्यवस्थापनाची जबाबदारी असेल.

मुंबईबाहेर काम करणाऱ्या मतदारांनाही दिलासा

अनेक नागरिक मुंबईत राहतात मात्र कामासाठी शहराबाहेर जातात. अशा मतदारांसाठीही आनंदाची बातमी म्हणजे, जर त्यांचे नाव मुंबईतील मतदार यादीत असेल आणि ते बाहेर कार्यरत असतील, तरीही त्यांना मतदानासाठी ही सुट्टी लागू राहील. लोकशाहीच्या या प्रक्रियेत प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा असल्याने महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचे स्पष्ट आदेश निर्गमित केले आहेत.

तक्रार करण्यासाठी 'या' नंबरवर करा संपर्क

जर तुम्हाला तुमच्या कार्यालयाने किंवा मालकाने 15 जानेवारी रोजी मतदानासाठी सुट्टी देण्यास नकार दिला, तर गप्प बसू नका. कर्मचाऱ्यांच्या तक्रारी निवारण्यासाठी पालिकेने विशेष हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. सुट्टी न मिळाल्यास तुम्ही 9122-31533187 या क्रमांकावर थेट संपर्क साधून आपली तक्रार नोंदवू शकता. तुमच्या तक्रारीची दखल घेऊन संबंधित आस्थापनेवर तात्काळ कारवाई केली जाईल.

हेही वाचा: Eknath Shinde Speech: 'जब चाहीए हरी पत्ती तब याद आती है ...'; एकनाथ शिंदेंची राज ठाकरेंवर टीका


सम्बन्धित सामग्री