महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, गुन्हेगारी, हवामान, वाहतूक, स्थानिक घटना आणि महत्त्वाच्या घडामोडींचे प्रत्येक अपडेट मिळवा एकाच ठिकाणी. राज्याच्या कानाकोपऱ्यात कुठे काय घडतंय, जाणून घ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि लाईव्ह अपडेट्ससह.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update
Maharashtra News Live Update

LIVE NEWS & UPDATES

  • 21 Oct 2026 11:41 AM (IST)

    पालघर-महामार्गावर इलेक्ट्रिक सामानाच्या आडून सुरू असलेल्या गुटखा तस्करीचा पर्दाफाश

    मुंबई अहमदाबाद महामार्गावर इलेक्ट्रिक सामानाच्या आडून सुरू असलेल्या गुटखा तस्करीचा पर्दाफाश करण्यात पालघर पोलिसांना यश आलं. कारवाई दरम्यान तब्बल 49 लाख 24 हजार 800 रुपयांचा गुटखा जप्त केला. महामार्गावर दापचरी सीमा तपासणी नाक्यावर तलासरी पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली. गुटखा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या टेम्पोसह एकूण 61 लाख 24 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

  • 21 Oct 2026 10:50 AM (IST)

    महाप्रसादात विषबाधा झाल्याने गावातील दीडशे ते दोनशे लोकांची प्रकृती खालवली…

    भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील खराशी गावामध्ये महाप्रसादाची जीवन घेतल्यानंतर गावातील दीडशे ते दोनशे नागरिकांची प्रकृती खालावली आहे नागरिकांना उलट्या व हगवण त्याचा त्रास सुरू झालेला आहे. सकाळपासूनच नागरिकांनी रुग्णालयात गर्दी केली असून अनेक नागरिक ग्रामीण व काही खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून गावांमध्येही आरोग्य विभागाकडून कॅम्प लावून उपचार सुरू आहेत.

  • 21 Oct 2026 10:13 AM (IST)

    ठाण्यातील अमेझॉन डेटा सेंटरला स्थगिती द्या – संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकल्पाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. ठाण्यातील निवासी भागात प्रस्तावित असलेल्या या डेटा सेंटरमुळे नागरिकांच्या पाणीपुरवठा, वीजपुरवठा, आरोग्य आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी भीती संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

  • 21 Oct 2026 08:58 AM (IST)

    म्हाडाच्या पुणे घरांसाठी अर्जाची मुदत ३० ऑक्टोबरपर्यंत वाढवली

    म्हाडाच्या 15 टक्के सामाजिक आणि 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनांसाठी मुदतवाढ करण्यात आली असून आता 30 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी आणि महाआयटी प्रणालीच्या अद्ययावतीकरणामुळे निर्णय घेण्यात आल्याचे समोर आले आहे.

  • 21 Oct 2026 08:55 AM (IST)

    भंडारा जिल्हा रुग्णालयात औषधांची टंचाई? गोरगरीब रुग्णांची परवड!

    भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात औषधांची टंचाई असल्याच्या तक्रारींमुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. दररोज ग्रामीण भागातून अनेक गोरगरीब, गरजू आणि वयोवृद्ध नागरिक उपचारासाठी येथे येतात. मात्र, आवश्यक औषधे मिळाली नाहीत, तर नाइलाजाने खासगी मेडिकलमधून महागडी औषधे खरेदी करण्याची वेळ त्यांच्यावर येते. मग अत्यल्प दरातील शासकीय आरोग्यसेवेचा लाभ घ्यायचा तरी कसा? औषधांचा नियमित पुरवठा सुनिश्चित करण्याची जबाबदारी नेमकी कुणाची? या प्रश्नांची दखल घेऊन संबंधित आरोग्य प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

  • 21 Oct 2026 08:54 AM (IST)

    अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचे उमेदवारी अर्ज माघारीचा आजचा शेवटचा दिवस

    जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस असून दुपारी तीन वाजेपर्यंत किती उमेदवार माघार घेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सभापती राम शिंदे आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि सहकार क्षेत्रातील दिग्गजांची बैठक पार पडली.

  • 21 Oct 2026 08:17 AM (IST)

    येवला तालुक्यात पेट्रोल पंपाच्या मंजुरीसाठी बनावट स्वाक्षरी आणि खोट्या गोल शिक्क्याचा वापर

    येवला तालुक्यात पेट्रोल पंपाच्या मंजुरीसाठी बनावट स्वाक्षरी आणि खोटा जावक क्रमांक वापरून कंपनीची दिशाभूल केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट दाखला कोणी तयार केला आणि त्यामागे कोणाचा हात आहे, याचा पोलीस तपास करणार आहेत.

  • 21 Oct 2026 08:14 AM (IST)

    वसमतमध्ये हळदीला 28 हजारांचा भाव! दसरा मुहूर्तावर दराची जोरदार उसळी

    हिंगोलीच्या वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीत दसऱ्याच्या मुहूर्तावर हळदीच्या दराने मोठी झेप घेतली आहे. 20 ऑक्टोबरच्या लिलावात दर्जेदार हळदीला प्रतिक्विंटल तब्बल 28 हजार रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला, तर बाजारपेठेत सुमारे सात हजार कट्ट्यांची आवक झाली. अपुऱ्या पावसामुळे हळदीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असून,आगामी काळातही दरातील तेजी कायम राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या दरवाढीमुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • 21 Oct 2026 07:20 AM (IST)

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीच्या दौऱ्यावर

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीच्या दौऱ्यावर असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.  सिंहस्थ कुंभमेळ्याच्या 31 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या धर्मध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण देणार असल्याची माहिती आहे.

  • 21 Oct 2026 07:13 AM (IST)

    धुळ्यात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा दसरा मेळाव्याऐवजी शेतकऱ्यांच्या बांधावर मुक्काम

    ​धुळे जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील दसरा मेळाव्याला जाणे टाळले. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्हाप्रमुख सतीश महाले आणि इतर पदाधिकाऱ्यांनी शिरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात प्रत्यक्ष जाऊन शेतकरी कुटुंबांची भेट घेतली व त्यांना दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर कपड्यांचे वाटप केले. या बिकट संकटकाळात सरकार आणि पक्ष पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा असून शेतकऱ्यांनी खचून न जाता धीर धरावा, असा दिलासा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला.

  • 21 Oct 2026 06:28 AM (IST)

    टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणात दोन महिलांसह चार आरोपींना अटक

    टायगर श्रॉफच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात दोन महिलांसह चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपासानुसार, आरोपींनी शस्त्रांची व्यवस्था करण्यासह मुंबईत पिस्तूल पोहोचवण्यात कथित भूमिका बजावली. या आरोपींचा गोळीबाराच्या कटात नेमका काय सहभाग होता, तसेच या संपूर्ण प्रकरणामागे आणखी कोणाचा हात आहे का, याचा तपास आता मुंबई पोलीस करत आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number