थकबाकीचा हप्ता देण्याबाबत एसटी महामंडळ आणि सरकारकडून सकारात्मक निर्णय होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या आश्वासनानुसार एसटी कामगारांना दरमहा दिला जाणारा वाढीव वेतनाचा हप्ता ११ फेब्रुवारी रोजीपर्यंत देण्यात यावा अन्यथा १२ फेब्रुवारी रोजीपासून राज्यभरात निदर्शने सुरू करण्यास येतील, असा इशारा एसटी कर्मचारी संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे
एसटी कर्मचाऱ्यांना २०२० ते २०२४ या कालावधीत कामगारांच्या मूळ वेतनात दिलेल्या ६,५०० च्या वाढीनुसार देय होणारी थकबाकीची रक्कम समान ४८ हप्त्यात डिसेंबर २०२५ च्या मासिक वेतनासोबत देण्याच्या सूचना प्रसारित केल्या होत्या. त्यानुसार, कामगारांना थकबाकीचा हप्ता मासिक वेतनासह मिळत होता. परंतु, फेब्रुवारी २०२६ च्या वेतनामध्ये हा थकबाकीचा हप्ता मिळाला नसल्याने कामगारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
हेही वाचा - Job Recruitment In Maharashtra : नोकरीची सुवर्णसंधी, राज्यात 70 हजार पदांची मेगा भरती; मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश
कामगारांना दरमह वाढीव हप्त्यासह मिळणारे वेतन विचारात घेऊनच महिन्याचे आर्थिक गणित मांडावे लागते. परंतु त्यांना वाढीव वेतनाचा हप्ता न मिळाल्यामुळे त्यांचे आर्थिक नियोजन कोलमडून पडले आहे, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्यावतीने देण्यात आली आहे.