Friday, November 07, 2025 08:55:28 PM

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी अक्षय कुमारला दिली पोलिसांच्या 'बूट डिझाईन'ची जबाबदारी; अॅक्शन हिरोने याकडे वेधलं लक्ष

अक्षय कुमारने मुलाखतीत पोलिसांच्या बुटांविषयीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या बुटांच्या रचनेमध्ये बदल करण्याचे मान्य केले.

devendra fadnavis  देवेंद्र फडणवीसांनी अक्षय कुमारला दिली पोलिसांच्या बूट डिझाईनची जबाबदारी अॅक्शन हिरोने याकडे वेधलं लक्ष

मुंबई : फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) साठी नुकतीच अभिनेता अक्षय कुमारने (Akshay Kumar) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत अक्षय कुमारने केवळ राजकीय आणि आर्थिक मुद्यांवरच नाही, तर महाराष्ट्र पोलीस दलाशी संबंधित एका अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. धावताना आणि कवायत करताना पोलिसांना येणाऱ्या अडचणी कमी व्हाव्यात, यासाठी सध्या पोलीस वापरत असलेल्या बुटांची रचना बदलण्याची मागणी अक्षय कुमारने फडणवीसांकडे केली, ज्याला मुख्यमंत्र्यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला.

अक्षय कुमारची मागणी आणि फडणवीसांचे आश्वासन
अक्षय कुमारने मुलाखतीत पोलिसांच्या बुटांविषयीचा मुद्दा उपस्थित करताना सांगितले की, "पोलिसांचे बूट हे टाचांचे (Heels) असतात, त्यामुळे त्यांना धावणे कठीण होते आणि धावताना पाठीच्या (Back Troubles) काही समस्या येतात. मी स्वतः स्पोर्ट्समन (Sportsman) असल्याने मला वाटते की, हे बूट बदलले तर पोलिसांना त्याचा उपयोग होईल आणि ते अधिक वेगाने धावू शकतील." या मागणीवर देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ सहमती दर्शवत, "तुम्ही चांगली गोष्ट सांगितली. आतापर्यंत कुणीही ही गोष्ट लक्षात आणून दिली नाही. पोलीस हेच बूट घालून कवायत करतात," असे कबूल केले. त्यानंतर फडणवीसांनी अक्षय कुमारला थेट नवीन बूट डिझाईन (Boot Design) करण्याची विनंती केली. "तुम्ही काही डिझाईन किंवा इनोव्हेशन (Innovation) सुचवले, तर आपण ते नक्की करू. तुम्ही अॅक्शन हिरो आहात, त्यामुळे कोणता बूट वापरावा हे तुम्हाला माहीत आहे. तुम्ही सुचवा," असे म्हणत फडणवीसांनी पोलिसांच्या बुटांमध्ये सुधारणा करण्याचे आश्वासन यावेळी दिले.

हेही वाचा - HC On Maratha Reservation: मराठा समाजाला मोठा दिलासा! हैदराबाद गॅझेटवरील स्थगितीस मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

पोलिसांच्या गणवेशात लवकरच होणार मोठा बदल
देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या बुटांच्या रचनेमध्ये बदल करण्याचे मान्य केले. या सकारात्मक प्रतिसादानंतर, महाराष्ट्रातील पोलिसांच्या गणवेशाचा (Uniform) महत्त्वाचा भाग असलेल्या बुटांमध्ये लवकरच मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अक्षय कुमारच्या मागणीनुसार आणि फडणवीसांच्या आश्वासनानंतर, आता पोलिसांना आधुनिक आणि आरामदायी बूट मिळतील अधिक वेगाने धावणे शक्य होणार आहे. यामुळे त्यांच्यात गुन्हेगारांना पकडतेवेळी अधिक चपळता येईल आणि त्यांच्या आरोग्यावरही चांगला परिणाम होईल.

हेही वाचा - Ban on Flying Lanterns : आता ड्रोन, आकाश कंदील उडवल्यास होईल कारवाई; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी केले निर्बंध जारी

गुन्हेगारी चित्रपटांविषयी काय म्हणाले मुख्यमंत्री?

याशिवाय, अक्षय कुमारने मुख्यमंत्री फडणवीस यांनी विचारले की, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, तुम्हाला गुन्हे, राज्यातल्या गुप्त गोष्टी, काळी बाजू सगळं माहीत आहे. मला हे जाणून घ्यायचं आहे गुन्हेगारी चित्रपट हे एकमेकांचं प्रतिबिंब आहेत का? - यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'मला वाटतं की राज्यातली गुन्हेगारी चित्रपटात दाखवण्यात येणाऱ्या गुन्हेगारी पेक्षा पुढे निघून गेली आहे. रस्त्यावर जोपर्यंत गुन्हे घडत होते तोपर्यंत असं दिसत होतं की लोक चित्रपटात पाहून ते अनुकरण करायचे. आताची गुन्हेगारी सायबर क्राईमची आहे. हे गुन्हेगार हुशार असतात. टेकसॅव्ही असतात. त्यांनी एक प्रश्नचिन्ह आमच्यापुढे निर्माण केलं आहे. येत्या काळात सायबर वॉर रोखणारे नायक दिसले पाहिजेत. कारण सायबर क्राईमचा हल्लाच जणू आपल्यावर झाला आहे असं दिसून येतं आहे. डिजिटल क्राईमचं मोठं आव्हान आहे.'


सम्बन्धित सामग्री