मुंबई: महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षावर जोरदार शब्दांत टीका करत अनेक राजकीय मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली. “आम्ही काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलो आहोत. त्यामुळे कुणीही चुकीचा निर्णय घेण्याचा प्रश्नच नाही,” असे ठाम मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
भाजपकडून काँग्रेसचे नगरसेवक संपर्कात असल्याचे दावे केले जात असताना, त्यावर प्रत्युत्तर देताना वडेट्टीवार म्हणाले, “भाजपचेच नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावा यावेळी त्यांनी केला, मात्र आमच्या कोणत्याही नगरसेवकाच्या संपर्कात कोणीही नाही. हा केवळ हवेत तीर मारण्याचा प्रकार आहे. कोणाचे नगरसेवक केव्हा बाहेर जातील, हे सांगता येत नाही, पण आम्ही एकत्रित राहूनच सत्ता स्थापन करणार आहोत. जनतेने आम्हाला कौल दिलेला आहे.”
लाडकी बहीण योजनेवर टीका
भाजपवर टीका करताना त्यांनी सांगितले की, “लाडक्या बहिणींना 14 तारखेला थेट खात्यावर पैसे जमा करून आधी मतं घेण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजपने केला. निवडणुकीत जे काही घडलं त्याबाबत चर्चांना काहीही अर्थ नाही. ‘जो जिता वही सिकंदर’ या न्यायाने जनतेने दिलेला कौल स्वीकारायलाच हवा.”
हेही वाचा: Income Tax Notice: बँक खात्यात फुटकी कवडी नाही, पण सरकारी रेकॉर्डवर हा मजूर आहे 'कुबेर'; वाचा या अजब लुटीची गजब कहाणी
महाविकास आघाडीबाबत भूमिका
राज्यातील सत्तासमीकरणांवर भाष्य करताना वडेट्टीवार म्हणाले, “राज्यात महाविकास आघाडीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि आम्ही काँग्रेस एकत्र आहोत. त्यामुळे चंद्रपूरमध्येही आम्ही एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी, असे मला वाटते.” चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसचीच सत्ता येणार असून, त्या दृष्टीने आवश्यक जुळवाजुळ पूर्ण झाल्याचा दावाही त्यांनी केला.
मुंबई, गुजरात आणि भाजपवर आरोप
वडेट्टीवार यांनी आरोप केला की, “भाजपला महाराष्ट्रात गुजरातची भाषा आणायची आहे. त्या दृष्टीने मुंबई आणि गुजरात भाजपाचा हा प्रयत्न सुरू आहे. सुरुवातीला प्रतिक्रिया काय येतात, हे पाहण्यासाठी भाषेचे प्रयोग केले जात असावेत.”
मुंबई महापालिकेबाबत ते म्हणाले, “मुंबईत भाजपचे संख्याबळ जास्त आहे, त्यामुळे महापौरपदाचा दावा करणे तसे पाहता योग्य आहे. मात्र, जर मुंबईत भाजपचा महापौर झाला, तर गुजराती समाजाला व्हाया पालघर मुंबईत शिरगाव करून देण्याचा मार्ग मोकळा होईल,” असा आरोपही त्यांनी केला.
बिहार भवन आणि मतपेढीचा आरोप
भाजपवर आणखी आरोप करताना वडेट्टीवार म्हणाले, “बिहारमधली मतं मिळवता यावीत, यासाठी मुंबईत बिहार भवन बांधण्यात येत आहे. हा सगळा प्रकार मतपेढी डोळ्यांसमोर ठेवून केला जात आहे.”
निवडणूक आयोगावर गंभीर टीका
निवडणूक प्रक्रियेबाबत बोलताना त्यांनी म्हटले, “निवडणूक आयोग हा सध्या सत्तेसोबत मिळालेला आहे. त्यामुळे पारदर्शक निवडणुकांची अपेक्षा आता त्यांच्याकडून ठेवणेही कठीण झाले आहे.”
अकोला आणि अमरावतीत सत्ता स्थापनेचे प्रयत्न
शेवटी वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले की, “अकोला महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. इतर पक्षांशी चर्चा सुरू असून, अमरावतीमध्येही तसेच प्रयत्न चालू आहेत.” एकूणच, विजय वडेट्टीवार यांच्या या पत्रकार परिषदेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तासमीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: KDMC Election 2026 : ठाकरे सेनेचा 'नॉट रिचेबल' नगरसेवकांना अल्टिमेटम; पक्षद्रोहाचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई करणार