Maharashtra Rain and Marathwada Drought Threat: यंदाच्या वर्षी मान्सूनचे आगमन तब्बल 1 महिना उशिराने झाले असून, जुलै महिन्यातही उन्हाचा व पावसाचा खेळ सुरू राहिल्याने समाधानकारक पाऊस झाला नव्हता. मात्र, सध्या उत्तरेकडे तयार झालेले 2 सायक्लोनिक सर्क्युलेशन तसेच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. या अनुकूल हवामान प्रणालींमुळे पुढील 5 दिवस महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 21 जुलैपासून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. परंतु, दुर्दैवाची बाब म्हणजे ही मुसळधार मालिका फार काळ टिकणार नसून, 31 जुलैनंतर मान्सूनच्या प्रवासाला पुन्हा एकदा मोठा ब्रेक लागून उकाडा वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये पावसाची चिंताजनक स्थिती
एकीकडे राज्यातील उर्वरित भागांत समाधानकारक पाऊस होत असताना, मराठवाड्यावर मात्र पावसाची प्रतीक्षा कायम आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशीव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या 8 जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने कोणताही मोठा अलर्ट जारी केलेला नाही. या भागांत केवळ रिमझिम किंवा तुरळक पावसाचीच शक्यता आहे. हवामान खात्याने यंदा मराठवाड्यात 80 टक्के पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला होता, परंतु आतापर्यंत केवळ 20 ते 21 टक्के पाऊस झाल्यामुळे हा अंदाज पूर्ण होणार की नाही, याबद्दल शंका उपस्थित होत आहे. गेल्या 24 तासांच्या आकडेवारीनुसार, विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे.
कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसासह उधाणाचा इशारा
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव वाढल्याने कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहणार आहे. आज जुलै महिन्यातील दुसरी सर्वात मोठी भरती असणार असून, समुद्रात तब्बल 4 मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. किनारपट्टीच्या भागात ताशी 40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने प्रशासनाने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आणि किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
अल निनोचे सावट आणि पुढील आव्हाने
जुलै महिन्याच्या शेवटी मान्सूनला ब्रेक लागल्यास राज्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील शेतकरी अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. अल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनच्या प्रवासात निर्माण होणारे हे व्यत्यय येत्या काळात बळीराजासाठी चिंतेचा विषय ठरू शकतात, ज्यामुळे ऑगस्ट महिन्यातील मान्सूनच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.