राज्यात यंदा पावसाचे प्रमाण अपुरे राहिल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जागितक तापमानवाढ आणि अल निनोच्या संकटामुळे नैऋत्य मान्सूनने ठरलेल्या वेळेआधीच माघार घेतली आहे. असे असतानाच आता राज्याच्या वातावरणात मोठा बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दसऱ्यानंतर राज्यात पावसाचे जोरदार कमबॅक होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच हवामान विभागानेदेखील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते वादळी पावसाचा इशारा दिला आहे. आगामी काळात होणाऱ्या या परतीच्या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळणार असला, तरी सध्याच्या या लहरी वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा नेमका अंदाज काय?
पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात 17 ऑक्टोबरपर्यंत वातावरण पूर्णपणे कोरडे राहील. त्यानंतर 18 ऑक्टोबरपासून वातावरणात अचानक बदल पाहायला मिळेल. दसरा झाल्यानंतर 20 ते 25 ऑक्टोबर दरम्यान राज्यात परतीचा पाऊस सक्रिय होईल. हा पाऊस सर्वदूर नसला तरी राज्यातील काही भागांत रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपात बरसेल. जोपर्यंत सकाळी धुके पडत नाही, तोपर्यंत पावसाचा जोर पूर्णपणे ओसरलेला मानला जात नाही.
महाराष्ट्राच्या दक्षिण भागात या पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, धाराशिव, लातूर, सोलापूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वाशीम, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये पाऊस चांगल्या प्रकारे बरसणार आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही काही ठिकाणी परतीच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाचा अलर्ट
तथापी, हवामान विभागाने दिलेल्या अपडेटनुसार, 15 ऑक्टोबरला कोल्हापूर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असून घाट भागात वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमी राहू शकतो. त्यानंतर 16 ऑक्टोबर रोजी राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे, ज्यामध्ये सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश आहे.
हेही वाचा – मोठी बातमी! हार्बर रेल्वे मार्गावर लोकल गाड्यांचा खोळंबा; कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांचे हाल
यानंतर 17 ऑक्टोबर रोजी तब्बल 11 जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला असून त्यात धाराशिव, लातूर, नांदेड, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसरीकडे, 14 आणि 15 ऑक्टोबरला मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.