Maharashtra school timings news 2026 : महाराष्ट्र राज्यात मान्सूनचा पाऊस अद्याप पूर्णपणे सक्रिय न झाल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये कमालीची उष्णता जाणवत आहे. या वाढत्या तापमानाचा आणि दमट हवामानाचा थेट फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा नियमित वेळेऐवजी सकाळच्या सत्रात भरवण्याची मुभा देण्यात यावी, अशी आग्रही मागणी आता पुढे आली आहे. 'अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळा'ने या संदर्भात थेट शिक्षण संचालकांकडे साकडे घातले असून स्थानिक परिस्थितीनुसार शाळांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देण्याची विनंती केली आहे.
हवामानातील प्रतिकूल बदल आणि एल-निनोचा प्रभाव
शिक्षण विभागाने आधी जारी केलेल्या परिपत्रकानुसार विदर्भ वगळता राज्यातील इतर सर्व विभागांमधील शाळा 15 जून 2026 पासून नियमित वेळेत सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार शाळा सुरू झाल्या असल्या, तरी हवामानातील तीव्र बदलांमुळे लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मुख्याध्यापक महामंडळाने शिक्षण संचालकांना 16 जून 2026 रोजी पाठवलेल्या विशेष पत्रात राज्यातील सद्यस्थितीवर खालीलप्रमाणे बोट ठेवले आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार या वर्षी एल-निनो परिस्थितीचा प्रभाव राहण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या हवामान बदलामुळे जून महिन्यातील मोसमी पाऊस लांबणीवर पडला असून अनेक भागांत अजूनही पावसाने दडी मारली आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये दुपारच्या वेळी तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या वर राहत आहे, ज्यामुळे दमट वातावरण वाढले आहे.
उच्च न्यायालयाचा विदर्भासाठीचा जुना निर्णय आणि नवा पेच
यापूर्वी विदर्भातील शाळा सुरू करण्याबाबतचा वाद प्राथमिक शिक्षक समितीने थेट उच्च न्यायालयात नेला होता. विदर्भामध्ये जून महिन्यात प्रचंड उष्णता असल्याने पूर्वीप्रमाणेच तेथील शाळा 30 जूनपासून सुरू करण्यात याव्यात, अशी विनंती करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडापीठाने ही विनंती मान्य करत सुट्टीच्या तारखांबाबत पुन्हा कोणताही घोळ घालू नये, अशी तंबीच शासनाला दिली होती. या निर्णयामुळे विदर्भातील शाळा 30 जूनपासून तर उर्वरित महाराष्ट्रात 15 जूनपासून शाळा सुरू करण्याचे आदेश निघाले होते. मात्र, आता उर्वरित महाराष्ट्रातही विदर्भासारखीच उष्णतेची स्थिती निर्माण झाल्याने वेळेचा नवा पेच निर्माण झाला आहे.
शिक्षण संचालकांना साकडे; स्थानिक पातळीवर सवलत देण्याची मागणी
महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब आवारी, अध्यक्ष के. एस. ढोमसे आणि सचिव अशोक मोरे यांनी शिक्षण संचालकांना पाठवलेल्या पत्रात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. दुपारच्या कडक उन्हात लहान मुलांना शाळेत ये-जा करणे अत्यंत त्रासदायक आणि आरोग्यासाठी घातक ठरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन संपूर्ण राज्यातील शाळांना त्यांच्या स्थानिक हवामानाचा अंदाज घेऊन येत्या 30 जून 2026 पर्यंत सकाळच्या सत्रात वर्ग चालवण्याची परवानगी अधिकृतपणे देण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
पालक आणि शिक्षक वर्गाचे शिक्षण विभागाच्या निर्णयाकडे लक्ष
शाळा सुरू झाल्या असल्या तरी पावसाचा पत्ता नसल्याने वर्गखोल्यांमध्ये बसणेही विद्यार्थ्यांना असह्य होत आहे. त्यातच नियमित वेळेनुसार दुपारच्या सत्रात शाळा भरत असल्याने मुला आजारी पडण्याची भीती पालकांकडून व्यक्त केली जात आहे. मुख्याध्यापक महामंडळाने सुचवलेला सकाळच्या सत्राचा पर्याय हा शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत दिलासादायक ठरू शकतो. या संवेदनशील मागणीवर आता राज्याचा शिक्षण विभाग काय पाऊल उचलणार आणि परिपत्रकात सुधारणा करणार का, याकडे राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहेत.