मुंबई: महाराष्ट्रातील हवामानात सध्या निसर्गाचा लहरीपणा पाहायला मिळत आहे. कधी हुडहुडी भरवणारी थंडी, तर कधी अंगाची लाहीलाही करणारा उकाडा, अशा विचित्र वातावरणाने नागरिक हैराण झाले आहेत. जानेवारी महिना संपत आला असतानाच, थंडीचा जोर ओसरून आता राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, आज राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता असून, अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
गेल्या 15 दिवसांपासून राज्यातील तापमानात मोठी उलथापालथ झाली आहे. साधारणपणे उत्तर भारतात थंडीची लाट आली की त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटतात, मात्र यंदा हे समीकरण काहीसे विस्कळीत झाल्याचे दिसते. सध्या उत्तर भारतात कडाक्याची थंडी असून पंजाब, हरियाणा आणि दिल्लीत पावसाचा इशारा देण्यात आला आहे, पण महाराष्ट्रात मात्र थंडीऐवजी पावसाळी स्थिती निर्माण झाली आहे. आज धुळ्यात राज्याच्या नीचांकी 8.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असली, तरी दिवसा मात्र ढगाळ हवामानामुळे उकाडा जाणवत आहे.
हेही वाचा: Sunetra Pawar: भल्या पहाटे सुनेत्रा पवार मुंबईत दाखल, आज घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
उत्तर भारताचा विचार करता, 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान लडाख आणि जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे. हिमाचल प्रदेश आणि चंदीगडमध्ये वादळाचा इशारा देण्यात आला असून, राजधानी दिल्लीत पुढील काही तासांत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. राजस्थानच्या जयपूर हवामान विभागानेही आज राज्याच्या अनेक भागात पावसाचा अहवाल दिला असून, या हवामान बदलाचा थेट परिणाम महाराष्ट्रातील वातावरणावर होताना दिसत आहे.
दुसरीकडे, मुंबईकरांसाठी वायू प्रदूषण हा चिंतेचा मोठा विषय ठरला आहे. थंडी आणि वाऱ्याच्या बदलत्या दिशेमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता कमालीची खालावली आहे. प्रशासनाकडून धुलीकण रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्या, तरी प्रदूषणाची पातळी कमी होताना दिसत नाहीये. वाढत्या धुक्यामुळे आणि धुरामुळे मुंबईची हवा अक्षरशः 'काळवंडली' असून, श्वसनाच्या विकारांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वातावरणातील या सततच्या 'कधी ऊन, कधी पाऊस' अशा लपंडावामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. ताप, सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. बदलत्या ऋतूचक्रात स्वतःला सुरक्षित ठेवणे हे आता मोठे आव्हान ठरत आहे. निसर्गाचे हे बदललेले रूप शेतीसाठीही चिंतेची बाब असून, शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.