उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातातील निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) कडून उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात असून, आज त्या शपथविधी घेणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. हे घडल्यास सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत.
या पार्श्वभूमीवर काल सायंकाळी सुनेत्रा पवार, नरेश अरोरा, जय पवार आणि पार्थ पवार हे पुण्यात पोहोचले होते. त्यानंतर आज पहाटे गाडीने प्रवास करत ते मुंबईत 'देवगिरी' या निवासस्थानी सकाळी दाखल झाले आहेत. आज होणाऱ्या शपथविधी आणि राजकीय बैठकींच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या हालचालींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या बैठकीत राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आणि उपमुख्यमंत्री पदाच्या पुढील प्रक्रियेवर सविस्तर विचारविनिमय झाल्याचे सांगितले जात आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी, “राष्ट्रवादी काँग्रेस जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल,” अशी स्पष्ट भूमिका मांडल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
हेही वाचा: India's First Budget : स्वतंत्र भारताचा अर्थसंकल्प कोणी आणि कधी सादर केला?
आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) च्या सर्व आमदारांची स्वतंत्र बैठक होणार आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री पदाची अधिकृत जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्याचा शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तसेच, अजित पवार यांच्याकडे असलेल्या अतिरिक्त जबाबदाऱ्या आणि काही मंत्रिपदांबाबतही या बैठकीत निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता असल्याची माहिती जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधि मनोज दयाळकर यांनी दिली आहे.
याच बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदाची सूत्रे कोणाकडे सोपवायची, याबाबतही अंतिम निर्णय होणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे आजची बैठक पक्षासाठी तसेच राज्याच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे.
एकूणच, आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अत्यंत महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यास, महाराष्ट्राला पहिल्यांदाच महिला उपमुख्यमंत्री मिळणार असून, ही घटना केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठीच नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी ऐतिहासिक ठरणार आहे.
हेही वाचा: WPL 2026: मुंबईचे 'जायंट' टेन्शन! सलग आठ पराभवानंतर गुजरातचा ऐतिहासिक विजय; हरमनप्रीतची खेळी ठरली व्यर्थ