Maharashtra Weather: बाप्पाच्या विसर्जनावर पावसाचं सावट! 25 सप्टेंबरला कुठे मुसळधार तर कुठे अतिमुसळधार; जिल्हानिहाय अंदाज

राज्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या काही भागांत सध्या पावसाच्या सरी सुरू असून, काही ठिकाणी मात्र उन्हाचा तडाखा कायम आहे.
महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचं संकट
महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचं संकट

मुंबई : राज्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या काही भागांत सध्या पावसाच्या सरी सुरू असून, काही ठिकाणी मात्र उन्हाचा तडाखा कायम आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम राज्याच्या हवामानावर होण्याची शक्यता असून, २५ सप्टेंबर रोजी अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस, मेघगर्जना आणि जोरदार वारे पाहायला मिळू शकतात.

विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसासोबत विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Mumbaicha Raja Visarjan 2026: ‘मुंबईचा राजा’चं उद्या विसर्जन नाही? तराफ्यावरून वाद; ऐतिहासिक मिरवणुकीत विघ्न

विदर्भात पावसाचा जोर अधिक

विदर्भातील भंडारा, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी हवामानाचा अंदाज अधिक गंभीर आहे. या भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळमध्येही पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी आणि वादळी वारे येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे संबंधित भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मराठवाड्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस

मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिवमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.

यासोबतच काही भागांत ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असल्याने मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

कोकणात हलक्या सरींची शक्यता

कोकण विभागात पावसाचा जोर तुलनेने कमी राहण्याची शक्यता आहे. पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडमध्ये काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्येही पावसाची शक्यता आहे.

मात्र, या भागासाठी कोणताही मोठा हवामान अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. त्यामुळे कोकणातील नागरिकांना सध्या मोठ्या पावसापेक्षा स्थानिक पावसाच्या सरींचा सामना करावा लागू शकतो.

उत्तर महाराष्ट्रात कुठे पाऊस तर कुठे कोरडे हवामान?

उत्तर महाराष्ट्रात जिल्हानिहाय हवामानात फरक दिसणार आहे. धुळे आणि नंदुरबारमध्ये हवामान तुलनेने कोरडे राहण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे जळगावमध्ये ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे.नाशिक, घाटमाथा आणि अहिल्यानगर परिसरात मेघगर्जनेसह हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात.

हेही वाचा: Lalbaugcha Raja Visarjan 2026: उद्या लालबागच्या राजाचा निरोप सोहळा; विसर्जन मिरवणुकीची वेळ, मार्ग आणि A टू Z माहिती जाणून घ्या

पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची हजेरी

पुणे शहर आणि घाटमाथा परिसरात हलक्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा आणि सांगलीमध्येही काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो. घाट परिसरात मेघगर्जनेसह सरी पडण्याचा अंदाज आहे.

सोलापूरमध्ये मात्र पावसापेक्षा वाऱ्याचा जोर अधिक जाणवण्याची शक्यता आहे. या भागात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. त्यामुळे सोलापूरसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, नागरिकांनी स्थानिक हवामानाच्या अपडेटवर लक्ष ठेवावे आणि मेघगर्जनेसह जोरदार वारे सुरू असताना मोकळ्या परिसरात जाणे टाळावे, असा सल्ला देण्यात येत आहे. राज्यातील विविध भागांत २५ सप्टेंबरला हवामानाचा हा बदल कितपत प्रभावी ठरतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version