मुंबई: महाराष्ट्रात सध्या निसर्गाचा अजब खेळ पाहायला मिळत आहे. ऋतूचक्र पूर्णपणे विस्कळीत झाले असून, थंडीच्या दिवसात उन्हाचा चटका आणि पावसाची हजेरी लागत आहे. उत्तरेकडे जरी बर्फवृष्टीमुळे कडाक्याची थंडी असली, तरी महाराष्ट्रातून मात्र थंडी अक्षरशः 'गायब' झाली आहे. 1 जानेवारी 2026 रोजी झालेल्या अवकाळी पावसाने वातावरणाची सर्व गणिते बदलून टाकली असून, फेब्रुवारी महिन्यातही हीच अनिश्चितता कायम राहण्याचे संकेत भारतीय हवामान विभागाने दिले आहेत.
वातावरणात कमालीचे चढ-उतार
डिसेंबरप्रमाणे जानेवारीतही हुडहुडी भरेल अशी शक्यता होती, मात्र प्रत्यक्षात थंडीने हुलकावणी दिली. सध्या राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण असून, तापमानात सतत चढ-उतार होत आहेत. विशेष म्हणजे, राज्याच्या इतर भागात उकाडा जाणवत असताना धुळ्यात मात्र 9.5 अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरींचा प्रभाव कमी झाल्यामुळे राज्यातून थंडीने काढता पाय घेतल्याचे चित्र आहे.
अवकाळी पावसाचे सावट आणि शेतीची चिंता
येत्या काही दिवसांत राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे. जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीत पावसाने हजेरी लावली असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होताना दिसतोय. फेब्रुवारी महिन्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे बळीराजाच्या चिंतेत भर पडली असून, 'आभाळ फाटलंय की काय?' अशी स्थिती निर्माण झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांवरही रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा: Devendra Fadanvis : मैत्रीची परिभाषाच वेगळी! अजित पवारांच्या निधनानंतर फडणवीसांचा मोठा निर्णय
मुंबई-दिल्लीत प्रदूषणाचा विळखा
हवामान बदलासोबतच आता वायू प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली आहे. मुंबई आणि दिल्लीतील हवेचा दर्जा खालावल्याने नागरिकांचा श्वास गुदमरत आहे. मुंबईत दिवसाही हवेत धुलीकणांचे थर दिसत असून, धूसर वातावरणामुळे दृश्यमानता कमी झाली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे आणि वाऱ्याचा वेग मंदावल्यामुळे प्रदूषणाचे हे 'काळे सावट' अधिक गडद होत चालले आहे.
आरोग्यावर घाला; रुग्णसंख्येत मोठी वाढ
बदलत्या हवामानाचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या आरोग्यावर होत आहे. 'कधी ऊन, कधी पाऊस' या लहरी हवामानामुळे सर्दी, खोकला, ताप आणि श्वसनाचे विकार वाढले आहेत. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठांना याचा मोठा फटका बसत असून, रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. वाढलेल्या वायू प्रदूषणामुळे दमा आणि ॲलर्जीच्या तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
हेही वाचा: Stock Market on Budget Day: शेअर बाजार सुरू पण गुंतवणूकदारांसाठी डोकेदुखी; काय आहे हा सेटलमेंट हॉलिडे?