मुंबई: सध्या राज्याच्या हवामानात 'कधी ऊन, कधी पाऊस' असा लपंडाव सुरू असून निसर्गाचे चक्र पूर्णतः विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीनंतर जानेवारीत हुडहुडी गायब झाली आणि आता फेब्रुवारी उजाडताच उन्हाच्या झळांसोबत पावसाचीही एन्ट्री झाली आहे. अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले असून, आजही अनेक भागांत ढगाळ हवामानासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे बळीराजासह सामान्य नागरिकही संभ्रमात पडले आहेत.
तापमानाचा पारा चढ-उतारावर
राज्यात एकाच वेळी तापमानाची दोन टोके पाहायला मिळत आहेत. उत्तर महाराष्ट्रातील धुळे येथे राज्यातील नीचांकी 10.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून तिथे अद्याप गारठा टिकून आहे. याउलट, कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरीत 34.5 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. "कुठे थंडीचा कडाका, तर कुठे घामाच्या धारा" अशी स्थिती सध्या महाराष्ट्रात आहे. दुपारी जाणवणारा उकाडा आणि रात्रीचा गारठा यामुळे आरोग्याच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली असून, दवाखाने सर्दी-खोकल्याच्या रुग्णांनी ओसंडून वाहत आहेत.
हेही वाचा: Palm Scan Payment: ना कॅश, ना कार्ड, ना मोबाईल… फक्त तळहात दाखवा आणि पेमेंट करा
मुंबईची 'हवा' खराब; प्रदूषणाने श्वास कोंडला
वाढत्या उकाड्यासोबतच मुंबईकरांना प्रदूषणाच्या विळख्याने ग्रासले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावली असून धुरक्याचे दाट थर पाहायला मिळत आहेत. वाढत्या वायू प्रदूषणामुळे मुंबईत श्वसनाचे विकार आणि फुफ्फुसांशी संबंधित आजार बळावत आहेत. सकाळी व्यायामासाठी बाहेर पडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांना याचा सर्वाधिक फटका बसत असून, मुंबईची हवा आता आरोग्यासाठी चिंतेचा विषय बनली आहे.
उत्तर भारतात 'हिमयुग'; जनजीवन विस्कळीत
एकडे महाराष्ट्रात उकाडा जाणवत असताना उत्तर भारत मात्र कडाक्याच्या थंडीने आणि बर्फवृष्टीने गोठला आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे पर्वत रांगांनी पांढरी शाल पांघरली आहे. हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानमध्ये सकाळच्या वेळी दृश्यमानता (Visibility) शून्य टक्क्यांवर आल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. कडाक्याची थंडी आणि धुक्यामुळे अनेक राज्यांमध्ये शाळा-कॉलेजांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
निसर्गाचा लहरीपणा आणि आरोग्यापुढील आव्हान
एकंदरीतच, उत्तरेकडे बर्फवृष्टीचा कहर आणि महाराष्ट्रात पावसाळी ढगांची गर्दी, असा टोकाचा विरोधाभास पाहायला मिळत आहे. हवामानातील हा बदल केवळ निसर्गापुरता मर्यादित नसून तो मानवी आरोग्यावर थेट घाला घालत आहे. "निसर्ग कोपला की काय?" अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. येत्या 24 तासांत राज्याच्या काही भागांत हलक्या पावसाची शक्यता असून, नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी आणि हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा: Mumbai Airport Incident: दोन विमानांचे पंख एकमेकांना घासले... सुदैवाने मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली