मुंबई: मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी, 3 फेब्रुवारी 2026 रोजी रात्रीच्या सुमारास एक थरकाप उडवणारी घटना घडली. टॅक्सीवेवर इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानांचे पंख एकमेकांना घासले गेल्याने मोठा अनर्थ ओढवता ओढवता राहिला. 'देव तारी त्याला कोण मारी' असा काहीसा अनुभव प्रवाशांना यावेळी आला, कारण दोन्ही विमाने प्रवाशांनी पूर्णपणे भरलेली होती. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र यामुळे नागरी विमान वाहतूक क्षेत्रात सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
ही घटना रात्री साधारण साडे सातच्या सुमारास घडली. हैदराबादहून मुंबईला आलेले इंडिगोचे विमान (6E 791) लँडिंगनंतर टॅक्सीवे 'B1' कडे वळत होते. त्याच वेळी, मुंबईहून कोइम्बतूरला जाण्यासाठी निघालेले एअर इंडियाचे विमान (AI 2732) धावपट्टीकडे जाण्यासाठी 'C1' वरून 'M4' कडे सरकत होते. या दरम्यान दोन्ही विमानांच्या उजव्या बाजूच्या पंखांची टोके (Wingtips) एकमेकांना धडकली. या धडकेमुळे एअर इंडियाच्या विमानाचे नुकसान झाले असून खबरदारी म्हणून दोन्ही विमाने तातडीने तपासासाठी 'बे' (Bay) मध्ये परत नेण्यात आली.
हेही वाचा: Rajinikanth: मोह हरला, माणुसकी जिंकली! सोन्याचे दागिने परत करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याचा रजनीकांतांकडून गौरव
इंडिगो एअरलाईन्सने या घटनेवर अधिकृत स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, "आमचे विमान हैदराबादहून मुंबईत उतरल्यानंतर पार्किंगकडे जात असताना ही तांत्रिक धडक झाली. आमची सर्वोच्च प्राथमिकता प्रवाशांची सुरक्षा असून, सर्व प्रवासी सुखरूपपणे विमानातून खाली उतरले आहेत." दरम्यान, एअर इंडियानेही भूमिका स्पष्ट केली असून, विमानाचे नुकसान झाल्यामुळे प्रवाशांची पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याचे आणि घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
घटनेची गांभीर्याने दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. डीजीसीएच्या मुंबई कार्यालयातील अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. एटीसी (Air Traffic Control) कडून मिळालेले निर्देश आणि दोन्ही वैमानिकांकडून झालेली हालचाल यामध्ये नेमकी कुठे चूक झाली, याचा शोध आता घेतला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, 'पुशबॅक' आणि टॅक्सीइंगच्या वेळेतील गणिते चुकल्याने हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
मुंबईसारख्या जगातील व्यस्त विमानतळावर अशा प्रकारे दोन विमाने समोरासमोर येणे ही चिंतेची बाब मानली जात आहे. एकाच वेळी शेकडो विमानांचे उड्डाण आणि लँडिंग होत असताना अशा प्रकारच्या 'ग्राउंड कोलिजन'मुळे मोठा विमान अपघात घडू शकला असता. या घटनेमुळे मुंबई विमानतळावरील काही काळ विमानांच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. सध्या दोन्ही विमान कंपन्यांना त्यांचा सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले असून, दोषींवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: Sunetra Pawar: राष्ट्रवादीचं अध्यक्षपदही सुनेत्रा वहिनींकडे?; निर्णय झालाय, केवळ घोषणेची प्रतीक्षा?