मुंबई: महाराष्ट्रात हिवाळ्याची चाहूल आता खऱ्या अर्थानं जाणवू लागली आहे. दिवसभर उन्हाचं अस्तित्व असलं तरी पहाटे आणि रात्रीच्या सुमारास हवेतला गारवा अंगात हुडहुडी भरत आहे. राज्यातील बहुतांश भागात तापमानात घट होत असून थंडीची लाट पसरू लागली आहे. पुणे, मुंबई, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र या सर्वच भागात थंडीत वाढ होत चालली आहे.
पुण्याचा पारा गेल्या काही दिवसांत झपाट्याने खाली आला आहे. काही दिवसांपूर्वी 16 अंशांवर असलेलं किमान तापमान आता थेट 14.3 अंशांवर आलं आहे. हवामान खात्याचा अंदाज तर आणखी थंडी वाढवणारा आहे. पुढील काही दिवसांत पारा 10 अंशांवर घसरण्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, मुंबईतही हिवाळ्याने हजेरी लावली असून शनिवारी पहाटेचं तापमान 21.2 अंश होतं, तर रविवारी ते 18 अंशांपर्यंत खाली आलं. या अचानक झालेल्या घसरणीमुळे मुंबईकरांनाही आता थंडीची चुणूक जाणवू लागली आहे. पहाटेच्या वेळचा समुद्रकिनाऱ्यावरचा गार वारा आणि धुकट हवामान शहराच्या वातावरणात भर घालत आहे. तळकोकणातही हिवाळ्याची चादर पसरत आहे.
सिंधुदुर्गात तापमान 14 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं असून या गारठ्याने आंबा आणि काजू पिकांसाठी पूरक वातावरण निर्माण झालं आहे. काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसानं चिंता वाढवली होती, पण आता हवामान स्थिर होऊन शेतीसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. सकाळच्या वेळी गावागावांत हलकं धुकं पसरलेलं दिसतंय, आणि शेतकरी वर्गही या बदललेल्या वातावरणाचं स्वागत करत आहे. उत्तर महाराष्ट्रात मात्र थंडीने जोरदार धडक दिली आहे. जळगाव जिल्ह्यात तापमान थेट 10.5 अंशांवर घसरलं आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत उकाड्यानं हैराण असलेला भाग आता गारठ्याने गोठू लागला आहे.
धुळ्यात तर थंडीने विक्रमी झेप घेतली असून आज सकाळी तेथील किमान तापमान 8.2 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. रस्त्यांवर धुक्याची चादर पसरली आहे आणि सकाळच्या सुमारास जनजीवन मंदावल्याचं दृश्य दिसतंय. मात्र, या थंडीचा फायदा रब्बी हंगामातील पिकांना होणार असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही गारठ्याने आपला प्रभाव दाखवला आहे. सोलापूरमध्ये पारा 18 अंश, सांगलीत 20 अंश, तर बीडमध्ये 21 अंश इतका नोंदवला गेला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर या किनारपट्टीवरील जिल्ह्यांतही तापमानात काही अंशांनी घट झाल्याने हवेत गारवा जाणवतोय.
हिवाळ्याच्या या सुरुवातीने महाराष्ट्रात एक वेगळीच झुळूक आली आहे. या सगळ्याने वातावरणात एक वेगळाच आल्हाददायक गारवा पसरला आहे. हवामान विभागाचा अंदाज आहे की पुढील आठवडाभरात पारा आणखी घसरण्याची शक्यता असून हिवाळ्याचा शिरकाव यंदा अपेक्षेपेक्षा लवकर आणि अधिक प्रमाणात होणार आहे.