Tuesday, November 18, 2025 03:39:08 AM

New Mumbai International Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ क्षमतावाढीला हिरवा कंदील; दरवर्षी 9 कोटी प्रवाशांची वर्दळ अपेक्षित

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या क्षमतावाढीस CRZ मंजुरी; 9 कोटी प्रवासी हाताळणी आणि 7.5 लाख टन कार्गो क्षमता निश्चित.

new mumbai international airport नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ क्षमतावाढीला हिरवा कंदील दरवर्षी 9 कोटी प्रवाशांची वर्दळ अपेक्षित

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Navi Mumbai International Airport) क्षमतावाढ प्रकल्पाला मोठा वेग मिळाला आहे. विमानतळाच्या विस्तार योजनेला किनारपट्टी नियमन क्षेत्राशी (Coastal Regulation Zone - CRZ) संबंधित मंजुरी मिळाली असून, आता हा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी राज्य पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाकडे (SEIAA) पाठवण्यात आला आहे. या विस्तारामुळे विमानतळाची प्रवासी हाताळणी क्षमता दरवर्षी 9 कोटी प्रवासी आणि 7.5 लाख टन कार्गो इतकी वाढणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन झाले असून, येत्या डिसेंबरपासून प्रवासी उड्डाणांना सुरुवात होणार आहे. हे विमानतळ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (NMIAL) या कंपनीद्वारे संचालित केले जाते. सुरुवातीला या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता 6 कोटी ठेवण्यात आली होती, ज्यासाठी 28 नोव्हेंबर 2011 रोजी पर्यावरण आणि किनारपट्टी नियमनाची मंजुरी देण्यात आली होती. ही मंजुरी 27 नोव्हेंबर 2031पर्यंत वैध आहे.

हेही वाचा: ECI Voter List Meeting: मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकनाची तयारी अंतिम टप्प्यात; आज सर्व राज्यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक

मात्र, अलीकडील काळात विमानवाहतुकीच्या वाढत्या गरजांचा पुन्हा आढावा घेण्यात आला. एनएमआयएएलने नियुक्त केलेल्या ICF Consulting (India) Pvt. Ltd. या संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार, आगामी काही वर्षांत प्रवाशांची संख्या नियोजित 6 कोटी क्षमतेपेक्षा जास्त होणार असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे विमानतळाची क्षमता अजून 3 कोटी प्रवाशांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

या प्रस्तावाला महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने मंजुरी दिली असून, विशेष म्हणजे या क्षमतावाढीसाठी नवीन जमीन घेतली जाणार नाही.विमानतळाच्या विद्यमान 1160 हेक्टर जमिनीवरच हा विस्तार केला जाणार आहे. समुद्रसपाटीपासून 8.5 मीटर उंचीवर बांधण्यात आलेले हे विमानतळ पर्यावरणीय जोखमींना तोंड देण्यास सक्षम आहे. प्रस्तावाचा सखोल पर्यावरणीय परिणाम अहवाल तपासल्यानंतर, वर्षाला 3 कोटी प्रवासी क्षमतेच्या वाढीमुळे कोणताही पर्यावरणीय धोका निर्माण होणार नाही, असा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे.

राज्य पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर, नवी मुंबई विमानतळाचा विस्तार प्रकल्प प्रत्यक्षात सुरू होईल. या निर्णयामुळे मुंबईच्या विद्यमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवासी दडपण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे आणि महाराष्ट्रातील विमानवाहतूक क्षेत्राला नवी दिशा मिळणार आहे.

हेही वाचा: Laadki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची नाराजी टाळण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय ; आदिती तटकरेंची मोठी घोषणा


सम्बन्धित सामग्री