Sunday, November 16, 2025 06:46:07 PM

Solapur BJP Conflict: सोलापूरमध्ये भाजपचे अंतर्गत कलह उफाळले; कार्यकर्त्यांचा ‘ऑपरेशन लोटस’ला तीव्र विरोध; मंत्री जयकुमार गोरे चिंतेत

सोलापूर भाजपमध्ये ‘ऑपरेशन लोटस’वरून अंतर्गत कलह उफाळला आहे. जयकुमार गोरे यांच्या मोहिमेला कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध झाला असून पक्षात असंतोष वाढला आहे.

solapur bjp conflict सोलापूरमध्ये भाजपचे अंतर्गत कलह उफाळले कार्यकर्त्यांचा ‘ऑपरेशन लोटस’ला तीव्र विरोध मंत्री जयकुमार गोरे चिंतेत

सोलापूर जिल्ह्यात भाजपचे ऑपरेशन लोटस सध्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील चार माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र, या घडामोडींनी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष उसळला आहे. विशेषतः दक्षिण सोलापूर तालुक्यात भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून, त्यांनी भाजप कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत निषेध व्यक्त केला आहे.

कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, "भ्रष्टाचारात अडकलेले नेते भाजपमध्ये आणले जात आहेत, जे पक्षाच्या मूल्यांविरोधात आहे.” या आंदोलनामागे भाजप आमदार सुभाष देशमुख यांचा गुप्त पाठिंबा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत स्पष्ट केलं की, “भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या नेत्यांना भाजपमध्ये स्थान नको.”

हेही वाचा: Toll Gate Open : दिवाळी बोनस कमी मिळाल्याने टोल कर्मचाऱ्यांचा संताप; हजारो गाड्या शुल्काशिवाय सोडल्या! कंपनीला लाखोंचा फटका

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे आणि त्यांची दोन मुले , तसेच यशवंत माने हे दिवाळीनंतर औपचारिकरित्या भाजप प्रवेश करणार आहेत. जयकुमार गोरेंच्या या ऑपरेशन लोटस मोहिमेमुळे विरोधी पक्षातील काही गड ढासळणार असल्याचे संकेत आहेत. मात्र, या निर्णयामुळे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाची लाट उसळली आहे.

भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, “इतर पक्षातून आलेल्या नेत्यांना प्राधान्य देऊन जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. आम्ही वर्षानुवर्षे पक्षासाठी काम केलं, पण आता आमच्याकडूनच त्याग अपेक्षित आहे.” त्यांच्या या संतप्त भावना भाजपच्या धरणे आंदोलनात स्पष्टपणे उमटल्या.

दक्षिण सोलापूर मधील आमदार सुभाष देशमुख यांचा प्रभावी पगडा आहे, तर दिलीप माने यांच्या संभाव्य प्रवेशामुळे त्यांची राजकीय समीकरणे बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच या तालुक्यात भाजपमध्ये अंतर्गत कलह उफाळला आहे.

भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी तोंडावर असताना असा अंतर्गत विरोध पक्षासाठी धोकादायक ठरू शकतो. कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे इशारा दिला आहे की, “बाहेरून आयात केलेल्या नेत्यांना जर स्थान दिलं, तर आम्हीच पक्षाच्या कार्याला बांधील नसू.”

या आंदोलनामुळे सोलापूर जिल्ह्यात भाजपचे अंतर्गत मतभेद उघड झाले असून, जयकुमार गोरे यांच्या ऑपरेशन लोटस योजनेला कार्यकर्त्यांचा मिळणारा विरोध हा पक्षासाठी मोठा डोकेदुखीचा विषय ठरू लागला आहे.

हेही वाचा: Dharashiv Accident : देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला!; कारच्या धडकेत 4 भाविकांचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर


सम्बन्धित सामग्री