Friday, February 13, 2026 01:20:07 AM

Malegaon Blast: मालेगाव हादरलं! प्रजासत्ताक दिनी पोलीस परेड ग्राउंडजवळ भीषण स्फोट; पाच जखमी

परेड ग्राउंडपासून साधारण 259 मीटर अंतरावर एक फुगे विक्रेता नायट्रोजन गॅस भरलेले फुगे विकत होता. नेमक्या त्याच वेळी गॅस भरत असताना सिलेंडरचा अचानक मोठा स्फोट झाला.

malegaon blast मालेगाव हादरलं प्रजासत्ताक दिनी पोलीस परेड ग्राउंडजवळ भीषण स्फोट पाच जखमी

Malegaon Blast: देशभरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असतानाच, मालेगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मालेगावमधील पोलीस परेड ग्राउंडपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या फुगे विक्रेत्याच्या नायट्रोजन गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. सोमवारी सकाळी 9:15 च्या सुमारास झालेल्या या स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

ध्वजारोहण सुरू असतानाच घडली दुर्घटना

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी पोलीस परेड ग्राउंडवर राष्ट्रध्वजाला सलामी देण्याचा कार्यक्रम सुरू होता. या सोहळ्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते. परेड ग्राउंडपासून साधारण 259 मीटर अंतरावर एक फुगे विक्रेता नायट्रोजन गॅस भरलेले फुगे विकत होता. नेमक्या त्याच वेळी गॅस भरत असताना सिलेंडरचा अचानक मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की त्याचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले.

हेही वाचा - Devendra Fadanvis : 'आपण देशाच्या विकासाचे इंजिन...', मुख्यमंत्र्यांनी मांडला विकासाचा रोड मॅप

पाच जण गंभीर जखमी; दोघांना नाशिकला हलवले

प्रजासत्ताक दिनानिमित्त फुगे खरेदी करण्यासाठी या विक्रेत्याजवळ नागरिक जमले असतानाच हा अपघात घडला. या दुर्घटनेत विनोद थोरात, मोहित जाधव, अतुल शेवाळे, प्रमिला यादव आणि उज्ज्वला महाजन अशी पाच जण जखमी झाले असून, यामध्ये दोन लहान मुले आणि दोन महिलांचा समावेश आहे. सर्व जखमींना तातडीने स्थानिक खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, यातील दोघांची प्रकृती अधिक चिंताजनक असल्याने त्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी नाशिक येथे हलवण्यात आले आहे.

प्रशासनाकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसराची नाकेबंदी केली. प्राथमिक तपासाअंती, फुगे फुगवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायट्रोजन गॅस सिलेंडरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हा स्फोट झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे उत्सवाच्या वातावरणावर विरजण पडले असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
 


सम्बन्धित सामग्री