पालघर: पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील तारापूर एमआयडीसीमध्ये एमडी (मेफेड्रोन) ड्रग्स तयार करणाऱ्या एका कारखान्यावर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत लाखो रुपयांच्या अमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई मुंबईच्या अंधेरी पोलिसांनी केली असून या प्रकरणात आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
या कारवाईची सुरुवात मागील आठवड्यात अंधेरीत एका कार चालकाला ताब्यात घेतल्याने झाली होती. पोलिसांनी त्याच्याकडून 2 लाख 80 हजार रुपये किमतीच्या 71 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ससह अटक केली होती. प्राथमिक चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. तपासाच्या धागेदोऱ्याने त्यांना पालघर जिल्ह्यातील बोईसरच्या तारापूर एमआयडीसी परिसरातील एका औषधनिर्मिती कंपनीपर्यंत नेलं.
या तपासातून ‘प्रॉब्लेम फार्मास्युटिकल्स’ या कंपनीचं नाव पुढे आलं. ही कंपनी औषधनिर्मितीच्या नावाखाली मेफेड्रोनसारख्या अंमली पदार्थांचं उत्पादन करत असल्याचं निष्पन्न झालं आहे. विशेष म्हणजे या कंपनीत रसायनशास्त्राची पदवी घेतलेल्या व्यक्तीकडून या पदार्थाचं रसायनशास्त्रीय पद्धतीने उत्पादन केलं जात होतं. पोलिसांनी या कंपनीवर छापा टाकून सुमारे 11 लाख 20 हजार रुपये किमतीचं 280 ग्रॅम मेफेड्रोन जप्त केलं आहे.
हेही वाचा: शनिशिंगणापूर देवस्थानात मुस्लिम कर्मचारी वाद; 14 जूनला सकल हिंदू समाजाचा आंदोलनाचा इशारा
याशिवाय या ड्रग्सचं उत्पादन करण्यासाठी लागणारा कच्चा माल आणि इतर साहित्य देखील मोठ्या प्रमाणावर ताब्यात घेण्यात आलं आहे. या कारवाईत अंधेरी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून सखोल चौकशी सुरू आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हे ड्रग्स मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अन्य शहरांत पुरवलं जात असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी जप्त केलेला मेफेड्रोन हा अत्यंत घातक आणि व्यसनाधीनता वाढवणारा ड्रग आहे. याच्या सेवनामुळे युवकांमध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे अशा ड्रग्जचं उत्पादन व वितरण थांबवणं अत्यंत आवश्यक आहे.
हेही वाचा: Share Market Scam: शेअर ट्रेडरच्या नावाखाली 21.35 लाखांचा घोटाळा उघड
मुंबई पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे अमली पदार्थांच्या साखळीतील एक महत्त्वाचा दुवा उघड झाला असून, यामधून आणखी काही मोठ्या गुन्हेगारी टोळ्यांचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आणखी आरोपींना अटक होऊ शकते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकारामुळे औद्योगिक क्षेत्रात होणाऱ्या बेकायदेशीर कारवायांबाबत नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांकडून अशा घटनांवर लक्ष ठेवण्यात येत असून भविष्यात आणखी कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.