Saturday, June 14, 2025 04:40:19 AM

शनिशिंगणापूर देवस्थानात मुस्लिम कर्मचारी वाद; 14 जूनला सकल हिंदू समाजाचा आंदोलनाचा इशारा

शनि शिंगणापूर मंदिरात मुस्लिम कर्मचाऱ्यांच्या कामामुळे हिंदू संघटनांचा विरोध; मंदिराच्या पवित्रतेवर आघात झाल्याचा आरोप; प्रशासनाकडे कर्मचाऱ्यांच्या बदल्याची मागणी.

शनिशिंगणापूर देवस्थानात मुस्लिम कर्मचारी वाद 14 जूनला सकल हिंदू समाजाचा आंदोलनाचा इशारा

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ श्री क्षेत्र शनि शिंगणापूर मंदिरामध्ये मुस्लिम कर्मचाऱ्यांची नेमणूक झाल्याच्या पार्श्वभूमीवर मोठा वाद निर्माण झाला आहे. हिंदू संघटनांनी या प्रकरणावर तीव्र आक्षेप घेत सकल हिंदू समाजाच्या वतीने मंदिराबाहेर विराट मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

मंदिर ट्रस्टमध्ये सध्या 114 मुस्लिम कर्मचारी कार्यरत असून त्यांना तात्काळ कामावरून हटवण्यात यावे, अशी मागणी संघटनांकडून करण्यात आली आहे. जर हे कर्मचारी कामावरून हटवले नाहीत, तर येत्या 14 जून रोजी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिला आहे.

हेही वाचा: 'सत्तेत राहून लोकांची सेवा न करता लूटमारच केली'; राऊतांचा पवारांवर आरोप

मंदिर ट्रस्टची भूमिका

मंदिर ट्रस्टने या वादावर स्पष्टीकरण दिलं असून, ट्रस्टमध्ये 114 मुस्लिम कर्मचारी काम करतात हे मान्य केलं आहे. मात्र ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, या कर्मचाऱ्यांपैकी एकाही मुस्लिम कर्मचाऱ्याची ड्युटी मंदिराच्या मुख्य गर्भगृहात किंवा चबुतऱ्यावर नाही. हे कर्मचारी मुख्यतः शेती विभाग, कचरा व्यवस्थापन विभाग आणि शिक्षणाशी संबंधित कामांमध्ये कार्यरत आहेत. यापैकी 99 कर्मचारी मागील पाच महिन्यांपासून कामावर अनुपस्थित असून त्यांच्या पगारावरही आळा घालण्यात आला आहे. उरलेले 15 कर्मचारी अनेक वर्षांपासून सेवा देत आहेत, ज्यात काहींचा अनुभव 20 वर्षांहून अधिक आहे.

वादाची पार्श्वभूमी

21 मे 2025 रोजी हा वाद उसळला, जेव्हा मंदिराच्या पवित्र चबुतऱ्यावर मुस्लिम कारीगरांनी ग्रिल बसवण्याचे, तसेच शनिदेवांच्या चबुतऱ्याची रंगरंगोटी व सफाई करण्याचे काम केले. ही बाब उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र मंदिर महासंघासह विविध हिंदू संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला. मंदिराच्या पवित्रतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप करत, संबंधित कर्मचाऱ्यांची तत्काळ हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

हेही वाचा: बीड जिल्ह्यात लग्नाच्या नावाखाली लाखोंचा गंडा; आठवडाभरात दोन टोळ्या जेरबंद

या विरोधानंतर मंदिर ट्रस्टने तात्काळ पावले उचलत मुस्लिम कर्मचाऱ्यांना मंदिर परिसरातील कामांवरून हटवले आहे. मात्र, संघटनांचा आक्षेप कायम असून सर्वच मुस्लिम कर्मचाऱ्यांची सेवा संपुष्टात आणावी, अन्यथा सकल हिंदू समाजाकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल, अशी भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.

या घटनेमुळे शनि शिंगणापूरसारख्या शांत आणि श्रद्धास्थळी धार्मिक तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन आणि मंदिर ट्रस्टपुढे मोठे आव्हान उभे ठाकले असून धार्मिक सौहार्द राखणे आणि मंदिराच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता ठेवणे हे गरजेचे ठरते. या प्रकरणाचा पुढील निर्णय काय होतो आणि तो कायद्यानुसार होतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


सम्बन्धित सामग्री