मुंबई: मध्य रेल्वेने शनिवार (रात्री 1:30) ते रविवारी पहाटे (4:30) दरम्यान कल्याण-बदलापूर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या कालावधीत जुना रेल्वे उड्डाण पूल हटवण्याचे काम केले जाणार असून, या कामासाठी मोठ्या क्रेनच्या साहाय्याने चार गर्डर काढण्यात येणार आहेत. त्यामुळे अंबरनाथ ते कर्जतदरम्यान काही लोकल आणि मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. प्रवाशांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
लोकल ट्रेन सेवांवर परिणाम
या मेगाब्लॉक दरम्यान काही लोकल गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
• शनिवारी रात्री 11:13 – परळ-अंबरनाथ लोकल बदलापूरपर्यंत चालवली जाईल.
• शनिवारी रात्री 11:51 – सीएसएमटी-बदलापूर लोकल अंबरनाथपर्यंत जाईल.
• शनिवारी मध्यरात्री 12:12 – सीएसएमटी-कर्जत लोकल अंबरनाथपर्यंत चालवली जाईल.
• रविवारी रात्री 2:30 – कर्जत-सीएसएमटी लोकल रात्री 3:10 ला अंबरनाथहून सीएसएमटीसाठी सोडली जाईल.
• रविवारी पहाटे 4:10 – कर्जत-सीएसएमटी विशेष लोकल चालवली जाणार आहे.
हेही वाचा: फुकट्यांकडून रेल्वेला मालामाल लॉटरी; वर्षभरात पावणेपाच लाख फुकटे प्रवासी गजाआड
मेल आणि एक्सप्रेस गाड्यांवर परिणाम
मेगाब्लॉकमुळे काही गाड्यांना कर्जत-दिवामार्गे वळवण्यात आले असून, काही गाड्या विलंबाने धावतील.
मार्ग बदललेल्या गाड्या:
• 11020 – भुवनेश्वर-सीएसएमटी कोणार्क एक्सप्रेस
• 18519 – विशाखापट्टणम-एलटीटी एक्सप्रेस
• 12702 – हैदराबाद-सीएसएमटी हुसेनसागर एक्सप्रेस
विलंबाने धावणाऱ्या गाड्या:
• 22178 – सिकंदराबाद-राजकोट एक्सप्रेस
• 11022 – तिरुनेलवेली-दादर एक्सप्रेस
प्रवाशांना सूचना
मेगाब्लॉकच्या काळात रेल्वे प्रशासनाने ठाणे स्थानकावर विशेष थांब्याची व्यवस्था केली आहे, जेणेकरून प्रवाशांना पर्यायी मार्गाचा उपयोग करता येईल. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना मेगाब्लॉक आणि गाड्यांच्या वेळेत झालेल्या बदलांचा विचार करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.