मुंबईत स्वतःचे हक्काचे घर असावे हे प्रत्येक नोकरदाराचे स्वप्न असते. मात्र, घर लागल्यानंतर एकाच वेळी मोठी रक्कम उभी करताना अनेकांच्या नाकी नऊ येतात. पैशांची जुळवाजुळव वेळेत न झाल्याने अनेकांवर हक्काचे घर गमावण्याची वेळ येते. मात्र, आता काळजीचे कारण नाही! म्हाडाने सर्वसामान्यांच्या या वेदनेवर फुंकर घालत एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. खाजगी बिल्डरांच्या धर्तीवर आता म्हाडाच्या घरांचे पैसे टप्प्याटप्प्याने भरण्याची मुभा मिळणार असून, मुंबईकरांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे.
पुढील काही दिवसात म्हाडा मुंबईत 'ॲडव्हान्स कॉन्ट्रीब्युशन स्कीम' (Advance Contribution Scheme) अंतर्गत गृहप्रकल्प उभारणार आहे. सध्याच्या पद्धतीत, इमारत पूर्ण होऊन 'ओसी' (OC) मिळाल्यावर विजेत्यांना 45 दिवसांत 25 टक्के आणि पुढील 60 दिवसांत उर्वरित 75 टक्के रक्कम भरावी लागते. इतक्या कमी कालावधीत बँकांचे कर्ज मंजूर होणे आणि पैसे भरणे अनेकदा अशक्य होते. यावर तोडगा म्हणून म्हाडा आता इमारत निर्माणाधीन असतानाच लॉटरी काढणार आहे आणि जसे बांधकाम होईल, त्याप्रमाणे विजेत्यांकडून पैसे स्वीकारणार आहे.
असा असेल पैसे भरण्याचा कालावधी:
या नव्या योजनेमुळे विजेत्यांना घराची पूर्ण रक्कम भरण्यासाठी साधारण तीन ते चार वर्षांचा पुरेसा कालावधी मिळणार आहे. याचे टप्पे खालीलप्रमाणे असतील:
सुरुवात: लॉटरीमध्ये नाव लागल्यानंतर सुरुवातीला केवळ 10 टक्के रक्कम भरावी लागेल.
हेही वाचा: Indian Student Died: दीड आठवड्यापासून बेपत्ता असलेल्या भारतीय विद्यार्थ्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू?
पहिला टप्पा: पुढील सहा ते आठ महिन्यांत 15 टक्के रक्कम भरावी लागेल.
दुसरा व तिसरा टप्पा: दुसऱ्या वर्षी 25 टक्के आणि तिसऱ्या वर्षी 25 टक्के पैसे भरावे लागतील.
अंतिम टप्पा: इमारतीला 'ओसी' मिळाल्यानंतर उरलेले 25 टक्के भरून घराचे रीतसर रजिस्ट्रेशन करता येईल.
'थेंबे थेंबे तळे साचे' याप्रमाणे आता टप्प्याटप्प्याने पैसे भरण्याची सोय झाल्याने मध्यमवर्गीयांच्या खांद्यावरील आर्थिक बोजा हलका होणार आहे. खाजगी विकासक जसे स्लॅबनुसार पैसे घेतात, तशीच ही पद्धत असेल. विशेष म्हणजे, बांधकाम जसे पुढे सरकेल तसे बँकेकडून कर्जाचे हप्ते थेट म्हाडाला जातील. त्यामुळे विजेत्यांना कर्ज मिळवणे अत्यंत सोपे होणार असून, त्यांची बँकेत होणारी धावपळ थांबणार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले की, सध्या मुंबईत तयार घरांची संख्या कमी असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रकल्प सुरू करतानाच लॉटरी काढल्यामुळे घरे पूर्ण करण्यास पुरेसा वेळ मिळेल आणि विजेत्यांनाही कोणतीही आर्थिक ओढाताण न करता आपल्या स्वप्नपूर्तीचे नियोजन करता येईल. थोडक्यात सांगायचे तर, म्हाडाचा हा निर्णय मुंबईकरांसाठी 'दुग्धशर्करा योग' ठरणार आहे.
या निर्णयाचा फायदा केवळ ग्राहकांनाच नव्हे, तर खुद्द म्हाडालाही होणार आहे. सध्या संपूर्ण प्रकल्प पूर्ण होईपर्यंत म्हाडाला स्वखर्चाने काम करावे लागते आणि घर विजेत्यांकडून पैसे येईपर्यंत वाट पाहावी लागते. या नवीन स्कीममुळे स्लॅबनुसार पैसे उपलब्ध होतील, ज्यामुळे म्हाडाच्या तिजोरीवर ताण येणार नाही आणि प्रकल्पांच्या कामात खंड पडणार नाही.
हेही वाचा: Jayant Patil: राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाला 'खो'; सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचा आक्षेप; विलीनीकरणाचा अध्याय तूर्तास बंद?