Friday, March 06, 2026 07:34:11 AM

Indian Student Died: दीड आठवड्यापासून बेपत्ता असलेल्या भारतीय विद्यार्थ्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू?

9 फेब्रुवारीपासून तो बेपत्ता होता. स्थानिक पोलिस तपास करत असून कुटुंबीयांना राजनैतिक मदत पुरवली जात आहे.

indian student died दीड आठवड्यापासून बेपत्ता असलेल्या भारतीय विद्यार्थ्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू

अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथे शिक्षण घेत असलेला 22 वर्षीय भारतीय विद्यार्थी साकेत श्रीनिवासय्या याचा मृतदेह सापडल्याची माहिती सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने रविवारी दिली. 9 फेब्रुवारीपासून तो बेपत्ता होता. स्थानिक पोलिसांनी मृतदेह सापडल्याची पुष्टी केल्याचे दूतावासाने सोशल मीडियावरील निवेदनात म्हटले आहे.

सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने निवेदनात या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत साकेतच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. कुटुंबाला आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधला जाईल तसेच पार्थिव भारतात लवकरात लवकर पाठवण्यासाठी आवश्यक व्यवस्था केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले. दूतावासाचे अधिकारी कुटुंबीयांशी थेट संपर्कात असून सर्व औपचारिकता पूर्ण करण्यासाठी मदत करत असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा: India Vs Pakistan Match: भारत-पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यावर पावसाचे सावट; पावसाने खेळ बिघडवला तर काय? 5 की 10 षटके... जाणून घ्या डकवर्थ-लुईसचा नवा नियम

साकेतला शेवटचे बर्कले हिल्स परिसरातील लेक अन्झा जवळ पाहण्यात आले होते. स्थानिक वृत्तांनुसार, त्याची बॅग शेजारच्या घराच्या दारात आढळून आली होती, ज्यामध्ये त्याचा पासपोर्ट आणि लॅपटॉप होते. त्यानंतर पोलिसांनी व्यापक शोधमोहीम राबवली होती.

कर्नाटकचा रहिवासी असलेला साकेत श्रीनिवासय्या याने आयआयटी मद्रास येथून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये बीटेक पदवी 2025 मध्ये पूर्ण केली होती. त्यानंतर तो कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथे केमिकल अँड बायोमॉलिक्युलर इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत होता. त्याच्या बेपत्ता होण्याच्या घटनेनंतर त्याचा रूममेट बनीत सिंग याने सोशल मीडियावर मदतीचे आवाहन केले होते आणि पोलिसांसोबत संपर्कात असल्याचे सांगितले होते.

दरम्यान, कर्नाटकच्या मुख्य सचिव शालिनी राजनेश यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला पत्र लिहून राजनैतिक मदतीची विनंती केली होती. स्थानिक पोलिस शोधकार्य करत असताना भारतीय वाणिज्य दूतावासही अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात होता. या दुर्दैवी घटनेमुळे विद्यार्थी समुदाय आणि कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे.

हेही वाचा: Farmer Loan Waiver: कर्जात बुडालेल्या शेतकऱ्याला सरकारचा भक्कम आधार; कृषिमंत्री भरणे म्हणाले 'या' तारखेला होणार कर्जमाफी, वाचा सविस्तर


सम्बन्धित सामग्री