मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांची आज मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक झाली. मायक्रोसॉफ्टकडून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार असल्याने दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. या बैठकीचे महत्त्व लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीसांनी हिवाळी अधिवेशनातून तातडीने मुंबईत दाखल होत बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन केले. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी सांगितले की मायक्रोसॉफ्टचा महाराष्ट्रात गुंतवणुकीचा प्रबळ मनसूबा आहे आणि त्यासाठी GCC (Global Capability Centers) हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्यात उभारण्याचा विचार आहे.
तब्बल 20 लाख स्क्वेअर फूट क्षेत्रफळावर हा भव्य प्रकल्प उभारला जाईल. विशेष म्हणजे हा प्रकल्प महाराष्ट्रातील तरुणांसाठी मोठ्या रोजगारसंधी निर्माण करणारा ठरणार आहे. जीसीसी प्रकल्पामुळे सुमारे 45 हजार रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली. आयटी, टेक्नॉलॉजी, डेटा, एआय आणि क्लाउड या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवा पिढीसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे. राज्य सरकार आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात लवकरच सामंजस्य करार (A Memorandum of Understanding. MoU) करण्यात येणार असून, महाराष्ट्राला जागतिक दर्जाचे टेक-हब बनवण्याच्या दिशेने ही महत्त्वपूर्ण पायरी मानली जात आहे.
हेही वाचा: Pune MHADA Lottery 2025: घर खरेदीसाठी पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 4186 घरांची सोडत अंतिम टप्प्यात
बैठकीत महाराष्ट्राला AI Hub करण्याबाबतही सविस्तर चर्चा झाली. यावेळी मायक्रोसॉफ्टने प्राईम AI OS ची डेमो फिल्म सादर केली आणि विविध क्षेत्रांत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence, AI) वापर कसा वाढवता येईल, यावर विचारमंथन झाले. आरोग्य, शिक्षण, उद्योग, प्रशासन आणि स्टार्टअप क्षेत्रात AI च्या मदतीने नव्या संधी कश्या निर्माण होतील, याबाबत दोन्ही बाजूंच्या तज्ज्ञांनी चर्चा केली.
सत्या नडेला यांनी सांगितले की मायक्रोसॉफ्ट भारतात तब्बल 1.57 लाख कोटी रुपये गुंतवणार आहे आणि ही कंपनीची आशियातील सर्वात मोठी गुंतवणूक असेल. या गुंतवणुकीतून AI, क्लाउड आणि डेटा सेंटरच्या पायाभूत सुविधांना मोठे बळ मिळणार आहे. भारताच्या डिजिटल भविष्यासाठी ही महत्त्वाची गुंतवणूक असून लाखो लोकांना नवी कौशल्ये शिकण्याची, प्रगती करण्याची संधी यातून मिळेल, असे नडेला म्हणाले.
या प्रकल्पांमुळे महाराष्ट्रात उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातील रोजगारांचे नवीन दरवाजे उघडणार आहेत. आयटी आणि एआय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मायक्रोसॉफ्टची ही गुंतवणूक मोठी संधी ठरणार आहे. महाराष्ट्राला जागतिक स्तरावर नवी ओळख देणारी आणि देशाच्या टेक-इकोसिस्टमला चालना देणारी ही ऐतिहासिक गुंतवणूक ठरणार असल्याचे राज्य सरकारचे मत आहे.
हेही वाचा: 'AI आता 'काय शक्य आहे' या सीमा..'; मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भविष्याविषयी काय म्हणाले?